बुद्धिबळाचा नवा बादशहा

0
7

गुरुवारी 18 वर्षीय गुकेशने क्लासिकल प्रकाराच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या डिंग लिरेनला पराभूत करून बुद्धिबळ विश्वाला चकित केले आणि प्रतिष्ठेचे विश्वविजेतेपद पटकावले. या विजयासह आनंदनंतर अशी कामगिरी करणारा गुकेश हा दुसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वीचा एकमेव भारतीय विश्वविजेता आनंद यांनी आपल्या पोस्टमध्ये गुकेशला प्रेमाने ‘राजा होणारा मुलगा’ असे संबोधले आहे, जो त्यांनी अनेक वर्षांपूर्वी तरुण प्रतिभेमध्ये पाहिलेल्या गुकेशच्या अफाट क्षमतेचा पुरावा आहे. युवा बुद्धिबळ प्रतिभा जोपासण्याच्या उद्देशाने आनंद यांच्या मेंदूतून साकारलेल्या वेस्टब्रिज आनंद बुद्धिबळ अकादमीच्या (वाका) पहिल्या बॅचचा गुकेश हा पदवीधर आहे. ‘वाका’च्या माध्यमातून गुकेश आणि इतर महत्त्वाकांक्षी खेळाडूंना या खेळातील सर्वोत्तम व्यक्तींशी अद्वितीय मार्गदर्शन आणि संपर्क साधण्यात यश आले आहे. गुकेशने अविश्वसनीय पातळीची लढाऊ वृत्ती, पोलादाची मज्जातंतू, उत्कृष्ट मानसिक कणखरता, आत्मविश्वासाची विलक्षण पातळी, चॅम्पियनचे सर्व गुण दाखवले आणि तो नुकताच मे महिन्याच्या अखेरीस 18 वर्षांचा झाला. तो व्यावसायिकही आहे, प्रगल्भ आहे, नम्र आहे आणि नेहमी सौजन्याने वागतो.गुकेश अजून त्याच्या शिखराच्या जवळ पोचला असला तरी तो आणखी प्रगती करेल. ‘गुकेशमध्ये आजवरचा सर्वोत्तम बुद्धिबळ दूत होण्याची क्षमता आहे. व्यावसायिक, प्रगल्भ, विनम्र, दर्जेदार, कर्तृत्ववान, सुस्पष्टवक्ते आणि सुसंस्कृत हे त्याचे गुण आहेत. तसे पाहता, सामन्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही शंका बाळगण्याचे कारण नाही. त्याचा प्रतिस्पर्धी डिंग लिरेन होता, ज्याला जेतेपद जिंकल्यापासून मानसिक आणि भावनिकदृष्ट्या कठीण काळ आला होता. दोघांनी रोमांचक सामना खेळला. लोकांना परफेक्शन हवे असेल तर दोघे समोरासमोर खेळताना पहा. 11व्या फेरीअंती गुकेश तब्बल एका गुणाच्या आघाडीसह जेतेपदाचा प्रबळ दावेदार होता. परंतु, 12व्या फेरीत लिरेनने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत दमदार विजयासह गुकेशला जोरदार धक्का दिला. लिरेनच्या या विजयानंतर बुद्धिबळ जगतातील दिग्गजांनी लिरेन आपले विजेतेपद राखणार असल्याचा अंदाज बांधताना लिरेन ‘फेव्हरेट’ असे जाहीर मत व्यक्त केले होते. तेराव्या फेरीत लिरेन व गुकेश यांनी बरोबरी मान्य केली. त्यामुळे चौदावी फेरी विश्वविजेता ठरविणारी होती. या फेरीत लिरेन पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणार होता. त्यामुळे त्याच्या विजयाची शक्यताच अधिक होती. या सामन्यात 55व्या चालीत लिरेनने केलेली घोडचूक गुकेशच्या पथ्यावर पडली. या एका घोडचुकीमुळे लिरेनचा पराभव झाला. अन्‌‍ बुद्धिबळ जगाला नवीन विश्वविजेता मिळाला. या संपूर्ण स्पर्धेत दोघांनीही वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये कमकुवतपणाचे क्षण दाखवले आणि दोघांनीही वेगवेगळ्या टप्प्यांवर ताकद दाखवली. क्लासिकल प्रकारातील क्रमवारीत गुकेश जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे तर लिरेन 22व्या. हा फरक शेवटच्या सामन्यात दबावाच्या परिस्थितीत प्रकर्षाने दिसून आला. रॅपिड व ब्लिट्झ प्रकारात वर्ल्ड नंबर 2 असलेल्या लिरेनला संपूर्ण स्पर्धेतील शानदार प्रदर्शनानंतर एक घोडचूक महागात पडली. शेवटच्या सामन्यापूर्वी दडपण ही मोठी समस्या असते. गुकेशने आपला वेळ चांगला सांभाळला आणि डिंगला शेवटच्या गेममध्ये ते जमले नाही. एवढाच फरक होता. गुकेशचा बुद्धिबळाचा प्रवास 2013 मध्ये आठवड्यातून तीन दिवस एक तासाचा साधा वर्ग घेऊन सुरू झाला. 2013 मध्ये त्याचे वडील डॉ. रजनीकांत यांनी त्याला बुद्धिबळाच्या वर्गात प्रवेश मिळवून दिला आणि तो आठवड्यातून तीन दिवस एक तास जात असे. त्याच्या बुद्धिबळ शिक्षकांनी तो चांगला असल्याचे सांगितल्याने त्याने वीकेंड स्पर्धा खेळण्यास सुरुवात केली. सुरवातीला यामुळे कुटुंबाची दिनचर्या फारशी विस्कळीत झाली नाही, डॉ. रजनीकांत यांनी वीकेंड स्पर्धेसाठी फक्त शनिवारची सुट्टी घेतली. मात्र, 2014 मध्ये गुकेशने आठवडाभर चालणाऱ्या रेटिंग स्पर्धांमध्ये प्रवेश केल्यानंतर परिस्थिती बदलली. यामुळे त्यांच्या आयुष्यात एका महत्त्वपूर्ण बदलाची सुरुवात झाली. व्यस्त ईएनटी सर्जन असलेल्या डॉ. रजनीकांत यांना आपले वेळापत्रक जुळवून घ्यावे लागले आणि ते पूर्वी पूर्णवेळ काम करत असलेल्या रुग्णालयांमध्ये व्हिजिटिंग सर्जन बनले.गुकेशला त्याच्या शाळेकडून काही रोख पारितोषिके आणि पाठिंबा मिळाला असला तरी काही काळापूर्वीपर्यंत महत्त्वपूर्ण आर्थिक मदत एक आव्हान होते. 2019 मध्ये जिब्राल्टर येथील स्पर्धेतून परतल्यानंतर गुकेश आणि त्याचे वडील पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदला भेटायला गेले होते. त्यावेळी गुकेशने जिब्राल्टरमध्ये खेळलेल्या खेळांबद्दल चर्चा केली आणि आनंद यांनी काही वेगळ्या चाली सुचवल्या. त्याचा त्याला सतत उपयोग होत राहिला..