बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या ताफ्यातील अग्निशामक दलाच्या वाहनाला काल बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील भगवानपूर येथे अपघात झाला. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत, तर राज्यपाल राजेंद्र आर्लेकर पूर्णतः सुरक्षित आहेत. जखमींवर हाजीपूर येथील इस्पितळात उपचार सुरू आहेत. राज्यपाल आर्लेकर हे पाटण्याहून मुझफ्परपूरला जात असताना हाजीपूर-मुझफ्परपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 22 वर हा अपघात झाला. भगवानपूरमधील रतनपुरा येथे त्यांच्या ताफ्यातील अग्निशामक गाडी दुभाजकाला धडकून रिक्षावर जाऊन आदळली. या अपघातातून राज्यपाल आर्लेकर हे सुरक्षितरित्या बचावले. आर्लेकर यांच्या वाहन ताफ्यामध्ये सहा ते सात वाहनांचा समावेश होता.