>> नवव्यांदा घेतली शपथ, नितीश कुमार एनडीएत सामील
बिहारच्या मुख्यमंत्रिपदी नितीश कुमार यांनी काल रविवारी संध्याकाळी 5 वाजता 9व्यांदा शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी आणि विरोधी पक्षनेते विजय सिन्हा यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे.
नितीश यांच्यासह यावेळी एकूण 8 मंत्र्यांनी शपथ घेतली. नितीश कुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळाची बैठक आज सोमवारी होणार आहे. यामध्ये खातेवाटप केले जाण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये शुक्रवारपासून राजकीय उलथापालथ सुरू होती व काल रविवारी या घडामोडींना पूर्णविराम मिळाला. नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना भारत माता की जय आणि जय श्री रामच्या घोषणा दिल्या. यावेळी जीतनराम मांझी, चिराग पासवान, सम्राट चौधरी, जे. पी. नड्डा उपस्थित होते. नितीश यांच्यासह जनता दल (युनायटेड) नेते विजयकुमार चौधरी आणि बिजेंद्रप्रसाद यादव आणि सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
एनडीएत सामील
देशात भाजपविरोधी वातावरण निर्माण करण्याकरता देशातील विरोधकांची मोट बांधण्याचे काम नितीश कुमारांनी केले होते. या विरोधकांच्या एकजुटीला इंडिया आघाडीचे नाव देण्यात आल्यानंतरही नितीश कुमार या आघाडीत अग्रभागी होते. अखेर ते इंडिया आघाडीलाच डच्चू देत एनडीएत सामील झाले आहेत.
जिथे होतो, तिथेच आलो
नितीश कुमार यांनी याबाबत बोलताना आम्ही जिथे होतो तिथे परत आलो आहोत आणि आता इकडे तिकडे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचे नितीशकुमार यांनी सांगितले.
दहा वर्षांत पाचवेळा मुख्यमंत्री पदाची शपथ
नितीश कुमारांनी काल नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गेल्या 10 वर्षांत त्यांनी पाच वेळा वेगवेगळ्या आघाडी आणि युतीसह सत्ता स्थापन केली होती. 2022 मध्ये त्यांनी एनडीएची साथ सोडून राजद-काँग्रेसच्या महागठबंधन सरकारमध्येही ते मुख्यमंत्री बनले होते. आता पुन्हा ते एनडीएमध्ये सामील झाले आहेत.