बिहारचे मुख्यमंत्री म्हणून आज नितीशकुमारांचा चौथ्यांदा शपथविधी

0
121

>> पक्षाचे बळ ७१ वरून ४३ वर घसरूनही संधी

संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीशकुमार आज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सलग चौथ्यांदा शपथ घेणार आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतेपदी त्यांची काल झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली. तत्पूर्वी संयुक्त जनता दलाच्या विधिमंडळ गट नेतेपदी त्यांची औपचारिक निवड करण्यात आली.

संयुक्त जनता दलाला बिहारच्या विधानसभेत केवळ ४३ जागांवर समाधान मानावे लागले आहे, परंतु सहयोगी पक्ष भाजपाने ७४ जागा जिंकून नेत्रदीपक कामगिरी केली असल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडी १२२ जागांचे बहुमत साध्य करू शकली आहे.

राष्ट्रीय जनता दल हा पक्ष ७५ जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष बनला आहे, परंतु कॉंग्रेसला केवळ १९ जागा मिळाल्या असल्याने सत्तास्थापनेपासून विरोधकांची ही महाआघाडी दूरच राहिली आहे. नितीशकुमार यांना मुख्यमंत्री बनविण्याच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या निर्णयावर राजद व कॉंग्रेसने रविवारी जोरदार टीका केली. जनाधार नसलेल्या नेत्याला मुख्यमंत्रीपदी का बसवता असा सवाल राष्ट्रीय जनता दलाने भाजपला केला आहे.

बिहारच्या निवडणुकीपूर्वी नितीशकुमार हेच आमचे भावी मुख्यमंत्री असतील अशी घोषणा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने केलेली होती, त्यानुसार निवडणुकीनंतर नितीशकुमार यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे.

नेतेपदी निवड होताच नितीशकुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर केला. राजभवनवर परतल्यावर त्यांनी पत्रकारांना आपण मुख्यमंत्री म्हणून सोमवारी शपथ घेणार असल्याची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती असणार का या प्रश्नाला त्यांनी बगल दिली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व चारही घटक पक्षांनी आपल्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शविलेला असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपला जेडीयूपेक्षा अधिक जागा मिळालेल्या असल्याने मंत्रिमंडळात त्या पक्षाला अधिक स्थान दिले जाणार आहे का या प्रश्नावरही नितीशकुमार यांनी मौन पाळले. भारतीय जनता पक्षाचे तारकिशोर प्रसाद हे उपमुख्यमंत्री असतील.