>> महिला विभागात नताशा बॅडमनने मारली बाजी
भारतीय सैन्यदलाच्या बिश्वरजीत सिंग सैखोम याने इतिहास रचताना काल रविवारी पणजी येथे झालेल्या भारतातील पहिल्यावहिल्या ‘आयर्नमॅन ७०.३’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. बिश्वरजीतने १.९ किलोमीटर स्विमिंग, ९० किलोमीटर सायकलिंग व २१ किलोमीटर धावणे हे एकूण अंतर ४ तास ४२ मिनिटे व ४४ सेकंदात पूर्ण केले. आयआयटी मुंबईचा निहाल बेग ४ तास ४७ मिनिटे व ४७ सेकंद वेळेसह दुसर्या स्थानी राहिला. मणिपूरचा महेश लॉरेंबाम याने ४ तास ५२ मिनिटांचा वेळ घेत तिसरा क्रमांक मिळविला. संभाव्य विजेत्यांत गणल्या गेलेल्या स्वित्झर्लंडच्या पाब्लो इरात याला ४ तास ५६ मिनिटे वेळेसह चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले.
पाब्लो याला पराभूत करण्याचे मागील कित्येक वर्षांचे स्वप्न सत्यात उतरल्याचे सैखोम याने विजयानंतर सांगितले. २०१५ साली गोवा ट्रायथ्लॉन स्पर्धेत पाब्लोने विजेतेपद पटकावले होते. ही स्पर्धा सैखोमने यशस्वीपणे पूर्ण केली होती. यानंतर पाब्लोने राखलेले सातत्य कमालीचे उत्साहवर्धक होते. त्याच्याच कामगिरीतून प्रेरणा घेत त्याला मागे टाकणे शक्य झाल्याचे सैखोम याने पुढे म्हटले. कालच्या विजयासह सैखोम याला पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणार्या आयर्नमॅन ७०.३ विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण मिळाले आहे. महिलांमध्ये सहा वेळची आयर्नमॅन विश्वविजेती नताशा बॅडमन ५.१८.४९ अशा शानदार वेळेसह पहिल्या स्थानी राहिली. श्रीलंकेची पाविलिन कहांदावाला (६.०७.३४) दुसर्या तर ऑस्ट्रेलियाची नताली एडवडर्स (६.०८.३१) तिसर्या स्थानी राहिली.