बिपरजॉयचा धोका

0
8

गोव्याच्या पश्चिमेस अरबी समुद्रामध्ये गेले काही दिवस ठाण मांडून बसलेले बिपरजॉय चक्रीवादळ ‘अति तीव्र’ बनून भारतीय भूप्रदेशाकडे सरकण्याची शक्यता वेधशाळेेने वर्तवली आहे. त्यामुळे केरळ, कर्नाटकपासून तिकडे मुंबई आणि गुजरातपर्यंत सर्व प्रशासनांनी त्यासंदर्भात खबरदारीचे आदेश जारी केले आहेत. मात्र, गोव्यात सरकारकडून अजून म्हणावी तशी सज्जता ठेवली गेलेली दिसत नाही. अर्थात, अशा चक्रीवादळांची दिशा क्षणाक्षणाला बदलत असते व त्यांचा जोरही कमीअधिक होत असतो, त्यामुळे ते नेमके भारताच्या कोणत्या भूप्रदेशावर घाला घालील की तेथवर पोहोचण्याआधीच विरून जाईल हे ठोसपणे सांगणे हवामानतज्ज्ञांनाही शक्य नाही. परंतु जेवढी तयारी केरळने, कर्नाटकने, महाराष्ट्र आणि गुजरातने ठेवली आहे, तेवढी आपण ठेवली आहे का या प्रश्नाचे उत्तर सरकारने स्वतःलाच विचारावे. गोव्याच्या पश्चिमेस अरबी समुद्रात सुमारे नऊशे किलोमीटरवर हे ‘बिपरजॉय’ घोंगावत राहिले आहे. त्याचा परिणाम म्हणून मोसमी पावसाचे गोव्यातील एरव्ही पाच जूनच्या सुमारास होणारे आगमन यंदा खूप लांबले. जूनचा दुसरा आठवडा उलटून गेला असला तरी अजून मोसमी पाऊस राज्यात दाखल झालेला नाही. आताकुठे हा नैऋत्य मोसमी पाऊस गोव्याच्या दिशेने निघाला आहे. हा अग्रलेख लिहीपर्यंत तो केरळच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचल्याची खबर आली आहे. दरवर्षी केरळमध्ये मोसमी पाऊस एक जूनला येत असतो. यंदा त्याला तेथवर पोहोचायला सात दिवसांचा उशीर झाला. गेल्यावर्षी तर 29 मे लाच तो केरळात दाखल झाला होता. यंदा या सात दिवसांच्या विलंबामुळे त्याचे गोव्यातील आगमनही पुढील 48 तास लांबू शकते. गोव्यात मोसमी पावसाचा प्रमुख जोर बारा जूनपर्यंत दिसेल असे हवामानतज्ज्ञ म्हणत आहेत. त्यामुळे सध्या ‘बिपरजॉय’च्या प्रभावामुळे राज्यामध्ये जी प्रचंड उष्णता दिसते, ते चित्र पालटेल आणि पावसाच्या शीतल सरी लवकरच कोसळतील अशी आशा करूया. सध्या तिकडे वायव्येला तामीळनाडू आणि पुडुचेरीमध्ये उष्णतेची लाट आहे. तेथील सरासरी तापमान चाळीस अंशांच्या वर गेलेले पाहायला मिळते आहे. आपल्याकडे मात्र दरवर्षीप्रमाणेच मोसमी पावसाची सर्वांना प्रतीक्षा आहे. शेतकरी पावसाच्या आगमनाची चातकासारखे वाट पाहत आहेत. राज्यात जूनअखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा असल्याचे जलसंसाधन खात्याचे अधिकारी सांगत आहेत, परंतु धरणांतील पाणीसाठा आटत चालला आहे हेही तितकेच खरे आहे. प्रशासन पावसाळी हंगामाला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे जे दावे छातीठोकपणे केले जात होते, त्यांची सत्यासत्यता येत्या काही दिवसांत स्पष्ट होईलच. ‘बिपरजॉय’ चा परिणाम म्हणून अति मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता भारतीय वेधशाळेने आणि स्कायमॅटने वर्तवलेली आहे. त्यामुळे अशा स्थितीत झाडे पडणे, विजेचे खांब कोसळणे, तारा तुटणे आदी प्रकार सामान्य असतात. मोसमी पावसाच्या आगमनापूर्वीच दक्षिण गोव्यात पहिल्या पावसाच्या तडाख्यात किती हानी झाली हे आपल्यासमोर आहेच. त्यामुळे प्रशासनाने बिपरजॉयच्या तडाख्यातून गोव्याला आणि गोमंतकीयांना वाचवण्यासाठी कंबर कसणे आवश्यक आहे. राज्यात सध्या मासेमारी बंदी लागू आहे, तरीही मच्छीमार समुद्रात उतरत असल्याने केवळ खवळलेल्या समुद्रात कोणी उतरू नये अशी सूचना जारी करणेच पुरेसे नाही. मुळात पावसाच्या तडाख्याने होणाऱ्या हानीचा सामना करण्यास प्रशासन सज्ज राहणे आवश्यक आहे. गोव्याचा पूर्वानुभव असा की जूनमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासरशीच मोठी चक्रीवादळे होणे, पूर येणे, शहरांतून पाणी तुंबणे असे प्रकार सर्रास होत असतात. वीज खाते, पाणीपुरवठा विभाग, अग्निशामक दल, पोलीस यांच्यासाठी हा काळ आव्हानात्मक असतो. राजधानी पणजी शहर तर सध्या सर्वत्र खोदून ठेवलेले आहे. त्यात स्मार्ट सिटीच्या कंत्राटदारांनी मलनिःस्सारण वाहिन्यांची वाताहत केलेली असल्याने पहिल्या पावसाचा तडाखा राजधानीला बसेल, तेव्हा पणजीत काय हाहाकार माजेल याची कल्पनाही करवत नाही. सध्या गटारागटारांतून सांडपाणी तुंबलेले आहे. त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरलेली दिसते आहे. उद्या जेव्हा पावसाच्या पाण्याचे लोट येतील तेव्हा ही सगळी घाण रस्त्यांवर आणि दुकानांत, घरांत शिरेल. त्यातून रोगराई आणि विशेषतः लेप्टोस्पायरोसिससारख्या साथींचीही भीती आहे. सामान्य नागरिकांच्या सेप्टिक टाक्यांतील सांडपाणी वाहू लागले तर नोटिसा बजावणारे आरोग्य खाते स्मार्ट सिटीच्या कंत्राटदारांनी करून ठेवलेल्या या वाताहतीबाबत मात्र मूग गिळून का बसले आहे? पाऊस दरवर्षीप्रमाणे येईल, परंतु ‘बिपरजॉय’मुळे यंदा तो तडाखाही देऊ शकतो हे भान निश्चितच ठेवायला हवे.