बाशुदेव भंडारी नेमका गेला कुठे?

0
1

>> पाणबुडे, ड्रोनच्या सहाय्याने राबवलेली शोधमोहीमही अयशस्वी

सांतइस्तेव येथे फेरी धक्क्यावरून कुंभारजुवे नदीच्या पात्रात कार गेल्यानंतर गेले महिनाभर बेपत्ता असलेल्या बाशुदेव भंडारी (गुजरात) या युवकाचा काल नदीपात्रात नौदलाचे पाणबुडे आणि ड्रोनच्या साहाय्याने शोध घेण्यात आला. तथापि, अजूनपर्यंत त्याचा काहीच थांगपत्ता लागू शकलेला नाही. बाशुदेव भंडारीच्या कुटुंबीयांकडून त्याच्या शोधासाठी पोलीस यंत्रणेवर दबाव आणल्यानंतर शोधमोहिमेला गती दिली आहे.

जुने गोवे पोलिसांनी यापूर्वी अग्निशामक दल व इतर यंत्रणांच्या साहाय्याने नव्याने शोधमोहीम हाती घेतली होती. त्यानंतर काल नौदलाच्या पाणबुड्यांनी कार पाण्यात गेलेल्या ठिकाणाच्या आसपासच्या परिसरात शोध घेतला. तसेच, ड्रोनच्या साहाय्याने तपासणी केली; मात्र तो सापडू शकला नाही.

जुने गोवे पोलिसांनी नदीपात्रातील शोधमोहिमेवेळी बाशुदेवचे वडील नारायण भंडारी यांना उपस्थित राहण्याची सूचना केली होती, त्यानुसार ते काल हजर होते.
आपला मुलगा नदीच्या पाण्यात नाही. आता, पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाची दिशा बदलली पाहिजे, असे बाशुदेव भंडारी याचे वडील नारायण भंडारी यांनी सांगितले. बाशुदेव बेपत्ता प्रकरणाची तक्रार दाखल करताना पहिल्याच दिवशी या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केला पाहिजे, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.