23 मुलांना किरकोळ दुखापत; चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याबाजूला कलंडली
कुंकळ्ळी युनायटेड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारा बालरथ काल सकाळी बाळ्ळी येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या खालील बाजूला जाऊन कोसळला. या अपघातात बसमधील 34 विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थी गंभीर जखमी झाले, तर 23 जणांना किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यावर मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात आले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे.
सविस्तर माहितीनुसार, कुंकळ्ळी युनायटेड विद्यालयाचा बालरथ नेहमीप्रमाणे काल सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत चालला होता. बालरथ बाळ्ळी येथे आरोग्य केंद्राजवळ पोहोचला असता अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याबाजूला कलंडले. या घटनेचे वृत्त कळताच परिसरात हाहाकार माजला. स्थानिकांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळींनी मदतीसाठी अनेकांनी धाव घेतली. बालरथाच्या मागील बाजूची काच फोडून मुलांना बाहेर काढण्यात आले. मात्र त्यांना त्यांना इस्पितळात नेण्यास रुगणवाहिका उपलब्ध होत नव्हती. या अपघातात 4 विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना पहिल्यांदा मिळेल त्या वाहनाने मडगावातील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी हलविण्यात आले. त्यानंतर किरकोळ दुखापत झालेल्या अन्य 23 विद्यार्थ्यांना सुद्धा रुग्णवाहिका व अन्य वाहनांतून तातडीने स्थानिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्रथमोपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. या अपघातात गंभीर जखमी चौघांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ : आलेमाव
बाळ्ळी येथील बालरथाला झालेला अपघाताचा प्रकार इव्हेंट मॅनेजमेंटने झपाटलेल्या भाजप सरकारचे गोव्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे संपूर्ण दुर्लक्ष झाल्याचे उघड करतो. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार निष्पाप विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला. तसेच राज्य सरकारने सर्व बालरथ आणि शैक्षणिक संस्थांचे तात्काळ सुरक्षा ऑडिट करावे, अशी मागणी त्यांनी केली.
युरी आलेमाव यांनी या अपघाताची माहिती मिळताच दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून जखमी विद्यार्थ्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्याची व्यवस्था केली. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातही त्यांनी जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली व त्यांची विचारपूस केली.
अपघाताच्या चौकशीचे आदेश : मुख्यमंत्री
बाळ्ळी येथील विद्यालयाच्या मुलांची वाहतूक करणाऱ्या बालरथला झालेल्या अपघाताच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. विद्यालयातील मुलांची वाहतूक करणाऱ्या बालरथाला झालेल्या अपघाताची चौकशी करण्याचा आदेश शिक्षण खाते आणि वाहतूक खात्याला देण्यात आला आहे. बालरथ बसगाडीची देखभाल ही शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी आहे आणि त्यासाठी सरकारकडून त्यांना अनुदान दिले जाते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.