बाळ्ळीतील 22 लाख चौरस मीटर जमीन विक्रीचा डाव

0
3

>> ग्रामस्थ आक्रमक; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घेणार भेट

केपे तालुक्यातील बाळ्ळी परिसरातील 22 लाख चौरस मीटर जमीन दलालांच्या माध्यमातून परप्रांतीयांना विक्री करण्यात येणार असल्याचे प्रकरण समोर आल्याने बाळ्ळी येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. येथील जमीन विक्री घोटाळा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा ठरणार असल्याचा दावा त्यांनी केला असून सरकारने या प्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

या साऱ्या प्रकारामुळे बाळ्ळी, फातर्पा, पिर्ला आदी परिसरातील जमीन परप्रांतीय बिल्डर लॉबीच्या घशात जाणार असल्याने जमीन मालकांमध्ये घबराट पसरली आहे. या जमिनीची विक्रीपत्रे तयार झाल्यास परिसरातील कित्येक गावांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होण्याची भीती स्थानिक लोकांनी व्यक्त केली आहे. त्या गावांमध्ये बाळ्ळी, वंटे, फातर्पा, पिर्ला तसेच आसपासच्या अन्य काही गावांचाही समावेश असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

बाळ्ळी-वंटे या गावातील जमीन मालक असलेल्या दोघा भावांनी वंटे गावातील अन्य जमीन मालकांच्या जमिनींबरोबर फातर्पा, पिर्ला आदी गावातील जमीन मालकांच्या जमिनींचाही सौदा करण्याचे धाडस केले असून खोटी कागदपत्रे तयार करून सगळी जमीन हडप करून विकण्याचा डाव रचला असल्याचे उघड झाल्यानंतर वंटे गावात एकच खळबळ माजली आहे. त्या दोघा यापूर्वीही बाळ्ळी येथील एका कुटुंबाची लाखो चौ.मी. जमीन बोगस कागदपत्रे तयार करून परप्रांतातील एका बड्या व्यक्तीला विकली आहे. सदर प्रकरणाची सुनावणी केपे मामलेदार कार्यालयात गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे.

ग्रामस्थ एकवटले
बाळ्ळीतील जमीन मालकांनी या प्रकरणी लढा देण्याचा निर्णय घेतलेला असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यात लक्ष घालावे यासाठी त्यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दोन महिन्यांपूर्वीच आम्हाला या जमीन घोटाळ्याची कुणकुण लागली होती. मात्र, त्यावेळी आमच्याकडे कोणतेही पुरावे नव्हते. आता आमच्या हाती काही कागदपत्रे लागली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.