बाळा मापारी यांचे स्मारकरूपी घर बांधणार

0
3

>> 60 व्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्र्यांची घोषणा

थोर गोमंतकीय स्वातंत्र्यसेनानी व गोवा स्वातंत्र्यलढ्यातील पहिले हुतात्मा बाळा राया मापारी यांच्या स्मरणार्थ गोवा सरकार त्यांचे स्मारक उभारणार आहे. शिवोली येथील त्यांच्या मूळ निवासस्थानी पुढील वर्षभरात सरकार एक घर उभारणार असून हे घर हेच हुतात्मा बाळा राया मापारी यांचे स्मारक असेल, अशी घोषणा काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केली.

बाळा राया मापारी यांच्या 60 व्या पुण्यतिथीनिमित्त अस्नोडा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, जिल्हा पंचायत सदस्य दीक्षा कांदोळकर, भंडारी समजाचे अध्यक्ष देवानंद नाईक तसेच बाळा राया मापारी यांची कन्या उपस्थित होती.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, 15 ऑगस्ट 1955 रोजी पत्रादेवी येथे 33 स्वातंत्र्यसैनिकांना पोर्तुगीजांनी गोळ्या घातल्या होत्या. यातील 15 जणांचा शोध घेऊन गोवा सरकारने त्यांचा मरणोत्तर सन्मान करताना प्रत्येकी 10 लाख रु. एवढी आर्थिक मदत दिली होती. बाळा राया मापारी हे स्वातंत्र्यलढ्यासाठी हुतात्मा ठरलेले पहिले स्वातंत्र्यसेनानी होते असे मुख्यमंत्री म्हणाले.

50 वर्षांनंतर बाळा मापारी यांचे स्मारक मंत्री हळर्णकर यांच्या प्रयत्नांमुळे उभे राहिले आहे. पण आता सरकार शिवोली येथे मापारी यांच्या मूळ निवासस्थानी स्मारकरूपी घर बांधणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गोवा भंडारी समाज आणि बाळा राया मापारी स्मारक देखरेख समिती
यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मंत्री श्री. शिरोडकर यांनी यावेळी, आपण आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचे ऋणी आहोत. आज आपण त्यांच्या बलिदानाच्या आणि हौतात्म्याच्या मोबदल्यात स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत, असे सांगितले.
मंत्री श्री. हळर्णकर यांनी गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीदरम्यान अस्नोडा हे केंद्रबिंदू होते असे सांगितले.