बाळा, गाऊ कशी अंगाई!

0
763

– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे
‘‘मॉम, वॉट्‌स अंगाई गीत?’’ अमेरिकेत जन्मलेला व तिथेच वाढलेला ७ वर्षांचा नातू आपल्या आईला विचारत होता. आईला त्याच्या प्रश्‍नाचे उत्तर माहीत नव्हते. कारण तिथेही अंगाई गीत ऐकले नव्हते. तीही अमेरिकेला जन्माला आलेली. भारतीय संस्कृती, येथील चालीरिती तिला माहित नव्हत्या. जाणून घ्यायचा प्रयत्नही कधी केला नव्हता. पाश्‍चात्य अमेरिकन संस्कृती तिच्या वागण्यात, बोलण्यात भिनली होती. चारच दिवसांपूर्वी मुलगा, सुनबाई व नातू अमेरिकेहून आपल्या घरी सुट्टीत आली होती. नातवाच्या कानावर हे शब्द कसे आले माहीत नाही; पण ते जाणून घ्यायची जिज्ञासा मात्र होती. आजोबांनी नातवाला पोटाशी धरले. त्याला ते समजावू लागले. समजावता समजावता त्यांचे डोळे भरून आले. त्या ७० वर्षांच्या म्हातार्‍याला आपल्या आईची आठवण झाली.संध्याकाळ झाल्यावर मुले खेळून घरी परततात. हात-पाय धुऊन देवघरांत देवाची आळवणी झाल्यावर पाढे म्हणायला लागतात. जेवल्यानंतर मग झोपायची तयारी होते. मग आई आपल्या मुलांना मांडीवर घेऊन अंगाई गीत म्हणत थोपटत झोपतात. असे पूर्वी चालायचे.
‘‘लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई…’’ हे अंगाई गीत ऐकून मुले झोपी जायची. कुणास ठाऊक लिंबोणीचे झाड जणू प्रत्येक घराशेजारी पूर्वेला असायचे. मी जन्माला आलो तेव्हा माझ्या बालपणी आमच्या घराशेजारी लिंबोणीचे झाड नव्हते. पण चंद्र झाडामागून यायचा. मी आईच्या उदरात होतो तेव्हा माझा वडिलभाऊ ६ महिन्यांचा होता. मी चुकूनच एंट्री घेतली होती. जन्माला आलो तेव्हा तो सव्वावर्षाचा होता. माझ्या आईने तेव्हा अंगाई गीत म्हटले असेल का? कुणासाठी? माझ्यासाठी की माझ्या मोठ्या भावासाठी?? मला तिने पोटाशी धरले असेल का? कुणास ठाऊक मीही तेव्हा अंगाई गीत ऐकले नसेल. तेवढे त्राण आईत उरलेही नसेल. मी असाच कुठेतरी कोपर्‍यात पडून झोपला असेन!
माझ्या मुलांची आई मात्र माझ्या दोन्ही मुलांना झोपवताना म्हणायची, ‘‘धोल म्हुजे बाय… न्हिद म्हुजे बाय, पी पी हाट्टोलो पाय’’ तुझे वडील चॉकलेट आणायला गेलेत. ते लवकरच परतणार – तेव्हा आता तू झोप. ती मुले झोपी जायची. दुसरे दिवशी पायच्या खिशात चॉकलेट आणायला पैसे नसायचे. मग त्या रात्री लिंबोणीच्या झाडामागे चंद्र यायचा. सगळे काही असेच नित्याने चालू असायचे.
कित्येक घरातून रात्रीचा गोंगाट ऐकू यायचा. जोरजोराने भांडणे व्हायची! मग ते धपाटे… रडारड. वाड्यावर हेल काढून कुत्री रडायची. घरात ती पोरे. तो चंद्र त्यांच्या झोपडीमागच्या फाटक्या दरवाजातून का नाही यायचा! मला आईने अंगाई गीत म्हणत का बरे झोपवले नाही. अजूनही मी स्वप्नात घाबरतो. ही बाजूला डाराडूर झोपलेली असते. मी तिला जागे करतो. म्हणतो मला घट्ट धर. माझी घाबरगुंडी झालेली असते. ती झोपेतून जागी होते. किलबिल्या डोळ्यांनी मला बघते. तिच्या झोपेचा विरस झालेला असतो. हळूवारपणे झोपेतच ती मला जवळ घेते. मला झोप लागते. अंगाई गीत ऐकण्यासाठी आतुरलेले कान आतुरलेलेच राहतात. त्या गीताच्या लहरी कानावर पडतही नाहीत. हल्ली मला ऐकायला कमी येते याचेच नवल वाटते. मला थोपटणारे हात थोपटवतच राहतात. झोप येत नाही. आतुरलेले कान मला झोपू देत नाहीत. डोळ्यांवरची झापड तशीच राहते!
कुणा एका जोडप्याने मागे एकाला दत्तक घेतले. जोडप्याचे वय वाढलेले. खरे म्हणजे, छोट्या मुलाला बघितल्यावर पान्हा फुटणार्‍या वयातच मुलाला दत्तक घेणे योग्य असते. इथे तर स्तनांत दुधाचा अंशही नव्हता. स्तन तर सुकून गेलेले. हृदयात मायेचा ओलावा नव्हता. सगळा काही व्यवहार… मुल दत्तक घेणे फक्त औपचारिकता होती. तिथल्या इस्पितळात डॉक्टरांकडे ओळख होती. अडलेली बाई इस्पितळात आली. घरात पहिल्यांदाच मुलांची मांदियाळी होती. तिने ते मुल पाडायचे ठरवले. ती इस्पितळाची पायरी चढली. त्या डॉक्टरांना ती भेटली. तिने तिला समजावले. उदरातील मुलाची जोपासना करायला प्रवृत्त केले. तिची गरज भागवली. मुलाच्या जन्मानंतर रितसर तिला पैशांची मदत करून ते मुल त्या जोडप्याच्या पदरात टाकले. त्या मुलाला तिने काही आपल्या पदराआड घेतले नाही. अंगाई गाण्याचा प्रश्‍नच नव्हता. तिला काही पान्हा फुटला नाही. दिवस जात राहिले. त्यांच्या घराशेजारी राहणार्‍या बाया त्या मुलाला सांभाळू लागल्या. त्यांच्या घरी तो खेळू लागला. हे जोडपे नेहमीच आपल्या दुकानावर जायचे. त्यांना फक्त पैसे कमवायचे खुळ होते. मुलाला आईचे प्रेम मिळाले नाही. पोरगा मोठा झाला. आईवडिल त्याच्याकडे कौतुकाने पाहू लागले. पण तो त्यांचा झालाच नाही. तो होता फक्त शेजार्‍यांचा. त्यांच्यावर तो प्रेम करायचा. त्यांनीच त्याला माया लावली होती. आज तो मऊ गादीवर झोपत होता. आलीशान गाडीतून आपल्या बायका-मुलाला घेऊन फिरवायचा. वडिल वारलेले. म्हातारी आई मरणाची वाट बघत अनाथाश्रमात विश्रांती घेत होती. तिने आपल्या मुलाकरता अंगाई गीत म्हटले नव्हते. तेव्हा त्याच्या वागण्यात त्याचा कोणताच दोष नव्हता. आज-काल शहरात झाडे नसतातच. त्यांत लिंबोणीचे झाड कुणी लावतच नाही. चंद्र नेहमीप्रमाणे पुर्वेला उगवतो व पहाटे पश्‍चिमेला लुप्त होतो. झाडामागे लपणारा चंद्र आजकाल कुणाला दिसत नाही. पूर्वी रडत रडत अंगाई गीत ऐकत झोपणारी मुले, आज हसत हसत आय-पॅडवर बारा वाजेपर्यंत खेळत, बर्गर, पिझ्झा खात, वर आईस्क्रीम खात झोपताना दिसतात.
मॉम, अंगाई गीत म्हणजे काय गं? पोरगा आपल्या आईला विचारतो. मॉम म्हणते – अरे जा विचार तुझ्या डॅडला. पोरगा डॅडकडे जातो. डॅड पूर्वीच ‘डॅड’ झालेला असतो. आजची पार्टी किती छान होती! त्या दिवसापेक्षा आजची दारू छान होती… जॉनीवॉकरची लज्जत औरच होती. वर ती कमर मुरडत, लचकत नाचणारी बारगर्ल तर लाजवाब होती. तिचे ते हास्य, ते स्पर्श अंगाला कसे जाळत होते!
डॅड, अंगाई गीत म्हणजे काय? पोरगा डॅडला विचारत होता. डॅडना चढलेली. त्यांनी कानशिलात चढवून दिली. पोरगा रडत रडत कोपर्‍यात झोपला. परत एकदा तेच… अंगाई गीत ऐकण्यासाठी आतुरलेले कान गप्प झाले होते. कानफटात मारलेली थप्पड… कान गप्प करून गेली होती. आता काहीच ऐकू येत नव्हते. दोन्ही पाय पोटाशी घेऊन शरीराची पोटली बांधून ते पोरगे कोपर्‍यात पडले होते.
माझीही ती सवय गेलीच नव्हती. हल्ली ऐकायला कमी येते. तेव्हा फाटलेला कान आज काहीही ऐकायला देत नव्हता. मलाही का कुणास ठाऊक पाय पोटाशी धरून पोटली करून घेतल्याशिवाय झोपच येत नव्हती.
कुणीतरी माझ्यासाठी अंगाई गीत म्हणाल का? ‘‘लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई…’’ माझे डोळे बटबटीत उघडे होते. मला झोप येत नव्हती. मी हिला म्हटले – अगं, मला जवळ घे… घट्ट धर मला! ती डाराडूर झोपलेली…!!