बालासोर रेल्वे अपघात टाळता आला असता…

0
7

>> रेल्वे सुरक्षा आयोगाचा अहवाल; सिग्नल यंत्रणेतील बिघाड अपघाताचे मुख्य कारण

ओडिशातील बालासोर येथील 2 जूनला झालेल्या भीषण रेल्वे अपघातात शेकडो जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अपघातात तीन रेल्वेंची धडक झाली होती. त्यातील एक मालगाडी होती, तर इतर दोन प्रवासी रेल्वे होत्या. या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. हा अपघात नेमका कुणाच्या चुकीमुळे झाला, हा प्रश्न उपस्थित होत होता. या अपघाताच्या जवळपास एका महिन्यानंतर रेल्वे सुरक्षा आयोगाने अपघातासंदर्भातल्या महत्त्वाच्या बाबी आपल्या अहवालात उघड केल्या आहेत. सोबतच ‘बालासोरचा भीषण रेल्वे अपघात टाळता आला असता’ असे रेल्वे बोर्डाला दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

रेल्वे सुरक्षा आयोगाने रेल्वे बोर्डाकडे स्वतंत्र अहवाल सादर केला आहे. सिग्नलच्या कामात बिघाड होता, त्रुटी होत्या. बाहानागा बाजार स्टेशन या ठिकाणी दोन समांतर रुळांना जोडणाऱ्या स्विचमध्ये त्रुटी निर्माण होत आहेत हे जर स्टेशन प्रबंधकांनी पूर्वीच लक्षात आणून दिले असते, तर तशी पावले उचलली गेली असती. सिग्नल यंत्रणेतला बिघाड हे अपघाताचे मुख्य कारण होते, असे या अहवालात म्हटले आहे.

रेल्वे रोड बॅरियरची दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नेटवर्कची स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा खराब केली होती. लोकेशन बॉक्सच्या आत वायरचे चुकीचे लेबलिंग होते. चुकीच्या सिग्नलमुळे रेल्वे चुकीच्या रुळावर गेली. त्यामुळेच दोन दशकांतील देशातील सर्वात भीषण रेल्वे अपघातात 293 जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, 1,000 हून अधिक लोक जखमी झाले.

सिग्नलिंगच्या कामात कमतरता असल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातासाठी सिग्नल विभागाला प्रामुख्याने जबाबदार धरले जात आहे. सिग्नलिंग कंट्रोल सिस्टीममधील बिघाड ओळखू न शकलेल्या स्टेशन मास्टरचेही नाव अहवालात घेण्यात आले आहे. बाहानागा बाजार स्टेशन या स्थानकावरच्या लेव्हल क्रॉसिंग गेट 94 वर इलेक्ट्रिक लिफ्टिंग बॅरियर बदलण्यात आली नव्हती. त्यातही त्रुटी आढळल्याचे म्हटले आहे. अपघाताच्या दोन आठवड्यांपूर्वी खरगपूर विभागातील बांक्रा नयाबाज स्थानकावर सदोष रिंग आणि सदोष वायरमुळे अशीच घटना घडली होती. त्यानंतर वायरिंग दुरुस्त केली असती तर बालासोर दुर्घटना घडली नसती. कोरोमंडल एक्सप्रेसला मुख्य मार्गासाठी हिरवा सिग्नल होता, तर रेल्वेची दिशा ठरवणारी यंत्रणा चुकीच्या पद्धतीने ‘लूप लाइन’कडे निर्देश करत होती, असेही रेल्वे सुरक्षा आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे.