बालरथ कर्मचारी आजपासून सेवेत

0
5

>> पगारवाढ दिल्याने संप मागे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील बालरथ कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपावर तोडगा काढण्यात अखेर यश मिळविले आहे. बालरथ चालकांना महिना 17 हजार रुपये आणि मदतनिसांना महिना 10 हजार रुपये पगार देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे बालरथ कर्मचारी संघटनेने आपला बेमुदत संप मागे घेतला असून आज गुरुवार दि. 20 जुलैपासून सर्व कर्मचारी कामावर रुजू होणार आहेत, अशी माहिती बालरथ कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष स्वाती केरकर शेट यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

बालरथ कर्मचारी संघटनेने विविध मागण्यासाठी सोमवार 17 जुलैपासून बेमुदत संपाला सुरुवात केली होती. राज्यातील अनुदानित विद्यालयातील बालरथ संपामुळे बंद राहिल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला होता. राज्य सरकारने बालरथ चालकांच्या पगारात 1 हजार रुपये आणि मदतनिसांच्या पगारात 500 रुपये वाढ जाहीर केली होती. तथापि, संघटनेने ही पगारवाढ मान्य नसल्याचे जाहीर करून बेमुदत संप सुरूच ठेवला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बुधवारी पुन्हा चर्चा केली. यात बालरथ चालकांच्या पगारात 6 हजार रुपये वाढ करून एकूण 17 हजार रुपये व मदतनिसांना पगारात 4500 रुपयांची वाढ करून एकूण 10 हजार रुपये पगार देण्यास मान्यता दिली आहे. पगारवाढ जून 2023 पासून लागू करण्याचे तसेच इतर प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे, असे केरकर यांनी सांगितले.