जीवन संस्कार- 4
- प्रा. रमेश सप्रे
आपण मुलांचं बालपण त्यांच्यापासून हिरावून घेतलं आहे. त्यांना शाळा नावाच्या कोंडवाड्यात कोंडण्याचा आपला प्रयत्न असतो. आपण अशा पूर्वप्राथमिक शिक्षणसंस्थांना ‘बालवाडी’, ‘शिशुवाटिका’ अशी नावं देतो. पण आपल्या पारंपरिक संस्कारात मुलांची अशी मुस्कटदाबी करण्याची व्यवस्था नाही.
‘अर्भकावस्थेत आपल्याभोवती स्वर्ग असतो’ या अर्थाचं एक सुभाषित आहे. याचा अर्थ अर्भक स्वर्गात असतं असा नसून, त्याच्या अस्तित्वाचा अनुभव अवतीभवती असलेल्यांसाठी स्वर्गीय असतो, असा आहे. फक्त घरातील माणसांनाच नव्हे तर कुत्रा-मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांनासुद्धा त्या तान्हुल्या जिवाच्या सान्निध्यात खूप आनंद होतो.
याचं एक मुख्य कारण, अगदी पहिल्यापासून त्या अर्भकावर निरनिराळे संस्कार होतात, ज्यांत घरातील सर्व व्यक्ती, नातेवाईक, शेजारी अशी मंडळीही सामील होतात. त्यातून आनंदाचे, सौहार्दाचे, प्रेमाचे संबंध निर्माण होतात. असे भावबंध निर्माण होऊन सारा कुटुंब-परिवार घट्ट विणीनं गुंफला जाणं हेच तर संस्कारांचं खरं उद्दिष्ट आहे.
भारतीय संस्कृतीत एकूणच जीवनसंस्कारांचा सर्वांगीण विचार केलाय. साधा मुलाचा नामकरण समारंभ पहा. बाराव्या दिवशी होणाऱ्या या संस्कारापूर्वी सहा दिवस आधी आणखी एक गोष्ट घडते असा समज आहे. सटी किंवा सटवाई नावाची देवी (शक्ती) नवजात अर्भकाच्या कपाळावर त्याचं भावी जीवन कसं असेल याचं वर्णन करणारा लेख लिहिते. कपाळ ही अशी जागा आहे की तिथं लावलेलं कुंकू पाहण्यासाठीही सुवासिनीला आरशाची गरज पडते. हातातली काकणं पाहायला तशी गरज नसते.
ब्रह्मदेवसुद्धा असा लेख कपाळावर लिहितो. त्याला विधीचा लेख किंवा विधिलिखित असं म्हणतात. अनेकांना ही अंधश्रद्धा वाटते; पण इतरजण जो विश्वास ठेवतात त्यांनाही तसं काही प्रत्यक्षात लिहिलं जात असेल असं वाटत नाही. पण कपाळावर लिहिलेलं न कळण्यात जीवनातील भावी घटनांबद्दल एक रोमांचित करणारी रहस्यमयी भावना आहे. त्यामुळे भयगंड निर्माण होण्याऐवजी जीवनाचा सकारात्मक स्वीकार करण्याची दृष्टी नि आपल्या जीवनातील भोग-उपभोगांबद्दल इतरांना दोष न देण्याची निरोगी वृत्ती दिसून येते. जीवनाबद्दल एक जिवंत कुतूहल निर्माण होतं जे जीवनाची रूची नि खुमारी वाढवतं. विठ्ठलाला ‘वेडा कुंभार’ म्हटलंय त्या गीतात गदिमा (ग. दि. माडगूळकर) अर्थपूर्ण ओळ लिहून जातात-
देसी डोळे परि निर्मिसी तयांपुढे अंधार।
विठ्ठला, तू वेडा कुंभार….॥
हा अंधार रहस्यमय भावी घटनांविषयीचा असतो.
आपण आपल्या जीवनपद्धतीतील वेगवेगळ्या वयात नि वेगवेगळ्या टप्प्यांवर केल्या जाणाऱ्या संस्कारांवर मुक्तचिंतन करत आहोत. नामकरण सोहळ्याबद्दल आपण पाहिलं. पण त्याचा एक विशेष लक्षात घेऊया. प्रसंग आहे पू. श्रीगोंदवलेकर महाराजांच्या जीवनातला. त्यांची पहिली तीन मुलं लहानपणीच गेली. ती अल्पायुषी असल्याची जाणीव श्रीमहाराजांना होती म्हणून त्यांनी कोणाचंही बारसं केलं नाही. यावर त्यांची साधीभोळी पत्नी म्हणते- ‘आपण बाळाचं बारसं करत नाही म्हणून ती वाचत नाहीत.’ श्रीमहाराजांचा दृष्टिकोन याच्या अगदी उलटा होता. ते म्हणत, ‘ती लवकर मरणार असतात म्हणून आपण नामकरण संस्कार करत नाही.’ पुढे हट्टानं पत्नीनं मुलीचं बारसं केलंच. पण त्यामुळे विधिलिखित चुकलं नाही. अडीच-तीन वर्षांची झाल्यावर ती मुलगी- शांता- हे जग सोडून गेली.
यासंदर्भात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवूया. नामकरण न होता गेलेली मुलं फक्त बाळं होती; पण नाव ठेवल्यामुळे ‘शांता गेली’ या स्मृतीमुळे होणाऱ्या मानसिक वेदनेत भरच पडली. आपण हे अपवादात्मक परिस्थितीतील मुलांबद्दल म्हणतोय हे लक्षात ठेवलेलं बरं.
एरव्ही नामकरण संस्कारामुळे मुलाला व्यक्तिमत्त्व प्राप्त होते. हल्ली तर त्याचं ‘आधारकार्ड’ही बनतं नि क्वचित पॅनकार्डही बनतं. रेशनकार्डावर नाव जातंच. नशीब हे की त्या अर्भकाचं निवडणूक कार्ड बनत नाही. असो.
‘रम्य ते बालपण’ असं म्हटलं जातं ते बालपण आज मुलांपासून आपण हिरावून घेतलं आहे. लवकरात लवकर त्यांना शाळा नावाच्या कोंडवाड्यात कोंडण्याचा आपला प्रयत्न असतो. आपण अशा पूर्वप्राथमिक शिक्षणसंस्थांना ‘बालवाडी’, ‘शिशुवाटिका’ अशी नावं देतो. पण आपल्या पारंपरिक संस्कारात मुलांची अशी मुस्कटदाबी करण्याची व्यवस्था नाही. ‘नवी शिक्षण प्रणाली’ (एनईपी) यावर गंभीर विचार करून या बालकांना आनंद, प्रेम देण्याची, वातावरण चैतन्यमय राखण्याची व्यवस्था निर्माण करण्यावर भर देत आहे. पण ही विचारसरणी प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी पालक-शिक्षकांचीच आहे. असो.
- विद्यारंभ संस्कार ः मुलांच्या शिक्षणाचा आरंभ अनेक संस्कार एकत्र येऊन (संस्कारपुंज बनून) सर्व संबंधितांच्या हृदयाला स्पर्श करणारा असावा. शाळेच्या वर्गाची किंवा सभागृहाची सजावट अगदी गुढ्या-तोरणे उभारून झाली नाही तरी उत्सवी नि उत्साही वातावरणात व्हावी अशी अपेक्षा आहे.
आजकाल शाळेच्या नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुलांचं स्वागत वाद्यसंगीताच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या डोक्यावर फुलांच्या पाकळ्यांची उधळण करून केलं जातं. त्यांना ओवाळलं जातं. त्यांना मिठाईसुद्धा दिली जाते. कपाळावर कुंकुमतिलक धारण केलेली मुलं टवटवीत फुलांसारखी दिसतात. हे सारं चांगलंच आहे. पण यानंतर जो खरा विद्यारंभ होतो तो एक वज्रलेप बनणारा संस्कार ठरावा ही अपेक्षा असते. यासाठी अभ्यासकेंद्री खेळ, गीत, अभिनय-गाणी, नकला-विनोद, शक्य असेल तर अभ्यासासंबंधी जादूचे प्रयोग अशा रंगीतसंगीत आनंदी वातावरणात नुसता विद्यारंभच नव्हे तर पुढील ज्ञानयज्ञ चालू राहावा ही खरी अपेक्षा असते. उत्सव नि उल्हास खूप झाला. त्यानंतर विविध नवे उन्मेष (कल्पकता), मन-मनगट-मस्तक यांना चालना देणारे उपक्रम हा विद्यारंभ संस्काराचा प्राण आहे.
शाळेतील प्राथमिक वर्गाच्या गणिताच्या पुस्तकाचं नावच आहे- ‘गणितातील जादू.’ हे शिकवण्यासाठी जादूगार शिक्षकापेक्षा जादूमय वातावरण अधिक प्रभावी ठरेल यात शंका नाही. हीच खरी विद्यारंभ संस्काराची मूस (मोल्ड) आहे. विद्यारंभ तसा तर घरीही होतो. ‘घरी नातवंडांसाठी अजोबांनी, तर शाळेत पंतोजींनी (गुरुजींनी) हाती धरिली पाटी’ असं म्हणतात. आरंभी ‘श्रीगणेशाय नमः’, ‘ॐ नमो सिद्धः’ अशी अक्षरे शिकवली गेली तर त्यात केवळ आरंभ देवाच्या नावानं करावा एवढाच भाव असतो. एरव्ही जोडाक्षरानं लेखनाचा आरंभ करायचा नसतो.
सध्या या विद्यारंभ संस्काराची एक मर्यादा बनून गेलीय. इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून असं काहीही घडत नाही. केवळ मातृभाषेतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच जणू संस्कार- संस्कृती- सुसंस्कृत बनण्याची गरज असते. पण ज्या शाळांत असा विद्यारंभ समारंभात्मक पद्धतीनं करतात तेथील वातावरण काहीकाळ तरी कौतुक- कृतज्ञता- स्मरणरंजन (नोस्टालिया) अशा विविध भावभावनांनी भरून ओसंडत असतं. याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं गरजेचं आहे, कारण या अनुभवाचं वर्णन शब्दांच्या पलीकडलं असतं. तसं पाहिलं तर कोणत्या ‘अनुभवा’चं वर्णन शब्दात करता येतं?