- – डॉ. मनाली म. पवार
(सांतइनेज- पणजी)
बालमधुमेहींची संख्या हळूहळू वाढते आहे. त्यामुळे सगळीकडे पालक मेळावे, विविध स्पर्धा, हितगुज असे कार्यक्रम होतात. बालमधुमेहींची योग्य काळजी घेऊन त्यांचे मनोधैर्य वाढल्यास हव्या त्या क्षेत्रात यशाची नवीन शिखरेही ते लीलया गाठू शकतात.
गोड पूर्ण बंदच करावं लागणार का? मनसोक्त खेळताही येणार नाही का? इन्स्युलीन पाचवीलाच पूजणार का? आता कारले, मेथी याच भाज्या खाव्या लागणार का? मासे- चिकन- मटणाचे काय? काय होणार आणि कसं होणार… अशा अनेक प्रश्नांचे काहूर पालकांच्या मनात उठताना दिसते व पालक अस्वस्थ होतात, जेव्हा त्यांच्या पाल्यांना मधुमेह आहे किंवा मधुमेहाचा धोका आहे असे समजते.
जन्मजात तसेच लहान मुलालाही मधुमेहाचा धोका असतो, हेच मुळी बर्याच पालकांना मान्य नसते. सद्यस्थितीत गर्भावस्थेतच स्त्रियांना मधुमेहाचा धोका वाढलेला आहे. त्यामुळे गर्भस्थ शिशुवर याचा प्रभाव पडतो. बीजरूपात जन्मापासून हा मधुमेह असतो. जन्मानंतर अनुकूल परिस्थिती प्राप्त झाल्यास हा प्रमेह लक्षण रूपाने व्यक्त होतो. अशा बालकांना ‘जातः प्रमेही’ असे म्हणतात.
आपल्या शरीराच्या पॅन्क्रियाजमध्ये म्हणजे स्वादुपिंडात अल्फा व बीटा पेशी असतात. बीटा पेशी इन्स्युलीन नावाचं एक संप्रेरक तयार करतात. इन्स्युलीनमुळे रक्तशर्करेचे प्रमाण एका विशिष्ट पातळीवर राखले जाते. बालपणातील मधुमेहात या बीटा पेशी नष्ट होतात. त्यामुळे इन्स्युलीन बनतच नाही. परिणामी मधुमेहाला हे बळी पडतात.
आनुवंशिकतेमुळे तर कधी कधी सायटोमेगॅलो व्हायरस, कॉक्सॅकी व्हायरस किंवा गालगुंडाचे विषाणू यांच्या हल्ल्यामुळे बालपणीचा मधुमेह होऊ शकतो.
बालपणातील मधुमेहाची लक्षणे ः-
- मुलाला सारखी भूक लागते.
- घसा सुकल्यासारखे होऊन सारखी तहान लागते.
- थकवा येतो.
- लघवी लागते. रात्री अंथरुण ओलं होतं.
- खूप भूक लागूनही वजन कमी होतं.
- स्वभाव चिडचिडा होतो.
- त्वचेवर रुक्षता, हातांच्या तळव्यांवर पिवळेपणाही दिसू शकतो.
- श्वासामध्ये साधारण ऍसिटोनचा वास येतो.
- शरीर गतीने क्षीण होऊ लागते.
- या रोगाचे प्रमुख उपद्रव म्हणजे ‘किटोसिस’. या व्याधीचे योग्य नियोजन वा चिकित्सा न घेतल्यास बालकाला भ्रम, तन्द्रा यांसारखे उपद्रव निर्माण होतात. श्वास घेताना त्रास होतो. कधी कधी पोटात दुखू लागते. त्वचा खरखरीत होते. अति मूत्रता… असे अनेक उपद्रव निर्माण होतात.
आपल्या पाल्याला मधुमेह आहे हे कळल्यावर गोंधळून जाऊ नये, खचून जाऊ नये, सकारात्मक विचार करावा. योग्य चिकित्सा, आहारातील नियमितता, व्यायाम ही त्रिसूत्री पाळून जगभरात लाखो बालमधुमेही आनंदात आयुष्य जगताहेत.
सध्या जगभरात इन्स्युलीन चिकित्सा म्हणून वापरली जाते. इन्स्युलीन तोंडावाटे घेता येत नाही. जठरातील पाचक रसामुळे इन्स्युलीन निकामी होते. त्यामुळे इन्स्युलीनचे इन्जेक्शनच घ्यावे लागते. सर्वसाधारणपणे किमान दोन वेळा तरी इन्स्युलीनचा डोज घ्यावा लागतो. डोज ठरवण्यासाठी लहान मुलांचे वय, वजन, शाळेच्या वेळा, शारीरिक श्रम, मैदानी खेळ या सर्वांचा विचार करावा लागतो. दिवसातून बर्याच वेळा रक्तशर्करेची तपासणी करावी लागते. एकदा नियमितपणा आला आणि सगळे स्थिरस्थावर झाले की इतक्या वेळा रक्त तपासावं लागत नाही.
- आहारात नियमितता व बंधने हवी, पण खूप निर्बंध घालू नयेत. तसे केल्यास मधुमेह नियंत्रणास सोपा जाईल… ही चुकीची समजूत आहे. उलट खूप दबाव आणल्यास मुलं बंडखोर बनतात अन् नियमिततेचा भंग करतात. त्यांना बालपणाचा आनंद लुटू द्यावा. त्यांच्या नकळत त्यांच्यावर लक्ष मात्र ठेवावे.
- शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, मैदानावरचे शिक्षक, स्कूलबसचे ड्रायव्हर अशा व्यक्तींना मुलाच्या मधुमेहाविषयी कल्पना द्यावी. हायपोग्लायसेमिया (रक्तातील साखर कमी होणे)ची कल्पना द्यावी. यात अचानक फार अशक्तपणा येणे, घाम सुटणे, फिट् येणे तर कधी कधी बेशुद्धावस्थाही येऊ शकते.
- ताबडतोब जवळील साखर खावी आणि डॉक्टरांकडे न्यावे.
- बेशुद्धावस्थेत काहीही खायला देऊ नये, अन्यथा अन्नपदार्थ सरळ फुप्फुसात जाऊ शकतात.
- कुटुंबातल्या लहानग्याला मधुमेह होणे ही गोष्ट सुरुवातीला निश्चितच भीती उत्पन्न करणारी असते. पण सध्या इन्स्युलीनच्या नवनवीन आविष्कारांमुळे बालमधुमेहींचे जीवन खूपच सुसह्य झाले आहे.
- बालमधुमेहींची संख्या हळूहळू वाढते आहे. त्यामुळे सगळीकडे पालक मेळावे, विविध स्पर्धा, हितगुज असे कार्यक्रम होतात.
बालमधुमेहींची योग्य काळजी घेऊन त्यांचे मनोधैर्य वाढल्यास हव्या त्या क्षेत्रात यशाची नवीन शिखरेही ते लीलया गाठू शकतात.