बार्देशात भाजपचा झेंडा

0
214

>> ९ पैकी ७ मतदारसंघ जिंकले; कोलवाळमध्ये अपक्ष कविता कांदोळकर यांची बाजी

जल्हा पंचायतच्या निवडणुकीत बार्देश तालुक्यात भाजपाने ९पैकी ७ मतदारसंघात विजय मिळवित आपला झेंडा फडकावला. तालुक्यातील एकूण नऊ मतदारसंघात भाजपाचे सात तर अपक्ष दोन उमेदवार निवडून आले. कॉंग्रेसला आपले खाते उघडण्यास अपयश आले. प्रतिष्ठेची ठरलेल्या कोलवाळ मतदारसंघात माजी आमदार किरण कांदोळकर यांनी आपली पत्नी कविता कांदोळकर यांना अपक्ष म्हणून निवडून आणण्यात यश मिळविले.

कोलवाळ व शिरसई
कोलवाळ मतदारसंघात अपक्ष उमेदवार कविता कांदोळकर या विजयी झाल्या. दोन हजाराहून अधिक मताधिक्य घेत कोलवाळ जिल्हा परिषदेवर विजयाचा पताका फडकावणार्‍या कविता कांदोळकर यांचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करीत स्वागत करण्यात आले.
शिरसई मतदारसंघात मात्र भाजपच्या दिक्षा कांदोळकर यांनी बाजी मारली. कोलवाळ मतदारसंघात पराभव पत्करावा लागल्याने नीळकंठ हळर्णकर यांच्यासाठी शिरसई मतदारसंघातील विजय महत्त्वाचा होता. त्यात जिल्हा पंचायतीसाठी मयडेही या मतदारसंघात येत असल्याने आणि किरण कांदोळकर यांनी विधानसमेसाठी हळदोणे मतदारसंघात आपण उमेदवारी भरणार असल्याचे संकेत दिलेले असल्याने ग्लेन टिकलो यांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यात ते यशस्वीही झाले.

शिवोली व हणजूण
माजी आमदार तथा मंत्री असलेल्या दयानंद मांद्रेकर तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रतिष्ठेचा बनवलेला भाजपचा बालेकिल्ला असलेला शिवोली मतदारसंघ दुसर्‍यांदा आपल्याकडे राखण्यात सनिशा तोरस्कर यांनी यश मिळविले. तर हणजुण जिल्हा परिषदेवर निहारिका मांद्रेकर या भाजपच्या उमेदवार प्रथमच निवडणून आल्या आहेत. स्थानिक पत्रकारांशी बोलतांना श्रीमती सनिशा तोरस्कर तसेच निहारीका नारायण मांद्रेकर यांनी आपल्या यशाचे श्रेय शिवोलीचे माजी आमदार तथा मंत्री दयानंद मांद्रेकर आणि पक्ष कार्यकर्त्यांना दिले.

हळदोणा
हळदोणा जिल्हा पंचायतीवर भाजपचे कमळ फुलवून विद्यमान आमदार ग्लेन टिकलो यांनी आपले वर्चस्व राखल्याचे दिसून आले. खुद्द हळदोणा पंचायत गोवा फॉर्वॉडचे किरण कांदोळकर यांच्या ताब्यात असतानाही हळदोणा जिल्हा पंचायतची जागा भाजपकडे खेचण्यात टिकलो यांना यश आले. बस्तोडाच्या माजी उप-सरपंच असलेल्या मनिषा नाईक येथे बाजी मारली.

सुकूर
पर्वरीचे विद्यमान आमदार रोहन खंवटे आणि भाजपासाठीही प्रतिष्ठेची सुकुर मतदारसंघातील लढत भाजपचे कार्तिक कुडणेकर यांनी जिंकली. सुकुरमध्ये भाजपचा उमेदवार जिंकून यावा यासाठी मंत्री मायकल लोबो यांनीही आपल्या परीने प्रयत्न केले होते.
पर्वरी हा विधानसभा मतदारसंघ अपक्ष आमदार रोहन खंवटे यांच्या ताब्यात असतांनाही सुकुर जिल्हा परिषदेची जागा भाजपकडे खेचून आणण्यात कुडणेकर यांना यश मिळाल्याने उत्तर गोवा भाजपचे अध्यक्ष महानंद अस्नोडकर यांनी हा विजय भाजपच्या विकासयात्रेचा असल्याचे सांगितले.