बाराही तालुक्यांत उद्या योग शिबिरे

0
11

>> जागतिक योगदिनानिमित्त सरकारकडून आयोजन

>> मुख्य कार्यक्रम डॉ. मुखर्जी स्टेडियममध्ये होणार

शुक्रवार दि. 21 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाची तयारी राज्यात जोरात सुरू असून, योगदिनी सरकारतर्फे मुख्य कार्यक्रम बांबोळी येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. या दिवशी राज्यातील बाराही तालुक्यात सकाळी 7 ते 8.30 या दरम्यान सरकारतर्फे योग शिबिरे होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

आंतरराष्ट्रीय योगदिन राज्यात यशस्वीपणे साजरा करण्यासाठी योगाच्या क्षेत्रात उल्लेखनीय असे कार्य केलेल्या विविध संस्थांची सरकार मदत घेणार असून, त्यात पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग, सद्गुरू योगभूमी, प्रजापती ब्रह्मकुमारी आदी विविध संस्थांचा समावेश असेल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

गावागावांतील प्राथमिक शाळांमधून महाविद्यालयांपर्यंतच्या शिक्षण संस्थांत योगदिन साजरा करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय गावागावांतही सकाळी 7 ते 8.30 या दरम्यान योग शिबिरांचे आयोजन केले जाणार असल्याचे ते म्हणाले.
राज्यातील महिलांना योग प्रशिक्षण देण्यासाठी 13 जूनपासून शिबिरे सुरू झाली होती. या शिबिरात सहभागी झालेले महिला गटही योगदिनी शिबिरे आयोजित करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

आंतरराष्ट्रीय योगदिनी ज्या संस्थांना योग शिबिरे आयोजित करायची आहेत, त्या संस्थांना योग शिक्षक हवे असतील त्यांना ते पुरवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. एवढेच नव्हे तर ज्या संस्थांना वर्षभर योग शिक्षक हवे असतील, त्यांनाही मोफत योग शिक्षक देण्याची सोय करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.