>> परीक्षेला 17718 विद्यार्थी बसणार
गोवा शालांत मंडळातर्फे घेण्यात येत असलेली बारावी इयत्तेची परीक्षा आज सोमवारपासून सुरू होत आहे. यंदा या परीक्षेला 17718 विद्यार्थी बसणार असून अकरावी इयत्तेत अनुत्तीर्ण झालेले 157 विद्यार्थीही बारावीची परीक्षा देणार आहेत. आतापर्यंत फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होत असलेली बारावीची परीक्षा यंदा प्रथमच फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होत असल्याचे गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले. बारावीच्या विद्यार्थ्यांना बारावी इयत्तेच्या परीक्षेनंतर व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास ‘नीट’ व ‘सीईटी’सारख्या प्रवेश परीक्षा द्यावा लागत असतात. ते लक्षात घेऊन यंदा बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती श्री. शेट्ये यांनी दिली.
दहावीची परीक्षाही लवकर
यंदा दहावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आलेला असून दहावीची परीक्षाही यंदा लवकर म्हणजेच 1 मार्चपासून सुरू होणार आहे व प्रमुख विषयांची परीक्षा 15 मार्चपर्यंत संपणार असल्याचे शेट्ये म्हणाले. यंदा बारावीची परीक्षा लवकर सुरू होत असल्याने निकालही लवकर लागणार असून परिणामी व्यावसायीक अभ्यासक्रमासाठीच्या परीक्षाही योग्य वेळी घेता येणार असल्याचे शेट्ये यांनी स्पष्ट केले. देशभरात बारावीच्या परीक्षा फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होतात. आतापर्यंत गोवा अपवाद होता. कारण गोव्यात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात या परीक्षा होत असत, असे ते म्हणाले.
दहावी तसेच बारावीची पेपर तपासणी मार्चपर्यंत
दहावी व बारावी इयत्तेची परीक्षा यंदा लवकर होत असल्याने दोन्ही परीक्षांची पेपर तपासणी यंदा मार्च महिन्यांपर्यंत पूर्ण होणार असल्याचेही शेट्ये यांनी दै. नवप्रभाशी बोलताना स्पष्ट केले. बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभरात 20 केंद्रे असून म्हापसा शहरात दोनच केंद्रे असल्याने यंदा कोलवाळ येथे आणखी एक केंद्र सुरू करण्यात आले असल्याचे शेट्ये यांनी सांगितले. दहावी इयत्तेच्या परीक्षेसाठी राज्यभरात 32 परीक्षा केंद्रे असल्याचे ते म्हणाले.