कोरोना आपत्तीमुळे अंतिम टप्प्यात बंद ठेवण्यात आलेली बारावीची परीक्षा काल पुन्हा सुरू करण्यात आली असता ३ हजार वर विद्यार्थ्यांनी तोंडावर मास्क घालून तसेच सामाजिक अंतर राखीत परीक्षा दिली. अशा प्रकारे सगळ्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करीत ही परीक्षा देणे ही त्यांच्यासाठी एक वेगळीच परीक्षा ठरली.
परीक्षागृहात आत प्रवेश करण्यापूर्वी या विद्यार्थ्यांनी सॅनिटायझर्सचा वापर केला. त्यांना तोंडावर मास्कही चढवावे लागले. त्यानंतर सामाजिक अंतराचा अवलंब करण्यासाठी जी आसन व्यवस्था त्यांच्यासाठी तयार केली होती त्या व्यवस्थेनुसार बसून या विद्यार्थ्यांना परीक्षा दिली.
विद्यार्थ्यांसाठी हा एक वेगळाच अनुभव होता. मात्र, त्याही परिस्थितीत ह्या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका लिहिल्याचे सूत्रांनी सांगितले. दहावी इयत्तेच्या परीक्षा आजपासून सुरू होत असून ही परीक्षा देणार्या हजारो विद्यार्थ्यांनाही आज मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करीत ही परीक्षा द्यावी लागणार आहे.