वास्को-बायणा येथील किनारपट्टीवरील ज्या १०२ घरमालकांना घरे खाली करण्याची नोटीस देण्यात आलेली आहे त्या घरांच्या मालकांनी काल आपल्या बायका-मुलांसह मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानावर मोर्चा आणला व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यालयात मागण्याचे निवेदन सादर केले. मुख्यमंत्री सध्या विदेश दौर्यावर असल्याने मोर्चेकर्यांना त्यांना भेटता आले नाही.
आपली घरे पाडण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा व घरे पाडण्यासाठी बजावलेल्या नोटीसाही मागे घ्याव्यात अशी मागणी मोर्चेकर्यांच्यावतीने त्यांचे नेते थालमन पेरेरा, ऍड. यतीन नाईक, स्वाती केरकर, सावियो ब्रागांझा व नरेश शिगांवकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर घेतलेल्या सभेतून केली.तत्पूर्वी वास्को येथून आलेल्या या घरमालकांनी पणजी बसस्थानकावरून मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानावर मोर्चा आणला. मात्र, यावेळी पोलिसानी या जमावाला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून सुमारे २० मीटर अंतरावर अडवल्यानंतर या जमावाने तेथे घरणे धरले व सरकारविरोधी घोषणा दिल्या.
यावेळी या लोकांचे नेते सावियो ब्रागांझा, ऍड. यतीन नाईक, स्वाती केरकर, नरेश शिगांवकर आदी नेत्यांनी आपल्या भाषणातून गोवा सरकारवर जोरदार टीका केली. आम आदमी पक्षाच्या नेत्या स्वाती केरकर म्हणाल्या की सरकारने प्रथम या लोकांचे पुनर्वसन करावे व नंतरच त्यांची घरे पाडण्याचे काम हाती घ्यावे. पुनर्वसन न केल्यास ही कुटुंबे कुठे जातील, असा प्रश्न त्यांनी केला.यावेळी बोलताना नरेश शिगांवकर म्हणाले की, सरकारने यापूर्वीच ७५ जणांची घरे पाडली आहेत. आता आणखी १०२ घरे पाडण्यासाठी नोटीस दिली आहे. या नोटीसा मागे न घेतल्यास गंभीर परिणामाचा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला. उपजिल्हाधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी काल ५ सप्टेंबरपर्यंत घरे पाडण्यासाठीची नोटीस दिल्याने काल या घर मालकांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मोर्चा आणला होता.