युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात समावेश होणाऱ्या बायंगिणी- जुने गोव्यातील नियोजित घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाला नागरिकांकडून विरोध केला जात असल्याने राज्य सरकारने या कचरा प्रकल्पावर पुनर्विचार करावा, असे आवाहन काल केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री, उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना येथे केले.
स्थानिक आमदार राजेश फळदेसाई, जिल्हा पंचायत सदस्य सिध्देश नाईक यांनी बांयगिणी कचरा प्रकल्पाला विरोध केला आहे. आता, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी बायंगिणी जुने गोवा येथील नियोजित कचरा प्रकल्पाबाबत उघड भूमिका जाहीर केली आहे.
राज्य सरकारने जनतेच्या हितासाठी बायंगिणी कचरा प्रकल्पावर पुनर्विचार करावा आणि प्रस्तावित प्रकल्प जुन्या गोव्याच्या बाहेर हालवावा. आपण राज्य सरकारकडे कचरा प्रकल्पाबाबतची समस्या मांडलेली आहे. कचरा प्रकल्प स्थलांतरित करावा म्हणून प्रयत्न करीत आहे, असे केंद्रीय मंत्री श्री. नाईक यांनी म्हटले आहे.
आपण कचरा प्रकल्पाच्या विरोधात नाही. तथापि, जुने गोव्यातील लोकांच्या इच्छेविरुद्ध होणाऱ्या प्रकल्पाच्या विरोधात आहे, असेही नाईक यांनी स्पष्ट केले.
या कचरा प्रकल्पाच्या प्रस्तावित जागेबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि कचरा व्यवस्थापनमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याकडे आधीच विषय मांडलेला आहे. वर्ष 2002 पासून बायंगिणी येथील कचरा प्रकल्पाचे काम प्रलंबित आहे. राज्य सरकारने लोकभावनेची दखल घेतली पाहिजे.
स्थानिक नागरिकांना कचरा प्रकल्प नको असेल तर अन्यत्र हलविणे योग्य ठरेल असे सांगून मंत्री नाईक यांनी, जुने गोवा हे जागतिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असल्याचे म्हटले.