गोवा राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाने बायंगिणी ओल्ड गोवा येथील नियोजित २५० क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला पर्यावरण दाखला मंजूर केला आहे. येत्या पाच महिन्यांत कचरा प्रकल्पाबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पाच्या बांधकामासाठी निविदा जारी केली जाणार आहे, अशी माहिती कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी काल दिली.
बांयगिणी ओल्ड गोवा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याला जनसुनावणीच्या वेळी स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता. त्यामुळे या प्रकल्पाच्या पर्यावरण दाखल्याकडे स्थानिकांचे लक्ष लागले होते.
या कचरा प्रकल्पाच्या सभोवतालचे पर्यावरण वातावरण बिघडणार नाही यासाठी दक्षता घेण्याची सूचना संबंधितांना करण्यात आली आहे. प्रकल्पाचे बांधकाम करताना सीपीसीबी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. बांधकाम साहित्याची वाहतूक करताना वाहनांवर आच्छादन घालावे. महत्त्वाच्या ठिकाणी धूळ प्रदूषण होऊ नये म्हणून पाण्याचा फवारणी करावी. धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करावी. प्रकल्पाचे बांधकाम निवासी वस्तीत केले जात असल्याने कचर्याच्या विभाजनासाठी बंद व्यवस्था करण्याची सूचना करण्यात आली आहे. हा पर्यावरण दाखला सात वर्षासाठी देण्यात आला आहे. या पर्यावरण दाखल्याच्या विरोधात ३० दिवसात राष्ट्रीय हरित लवादासमोर अपील केले जाऊ शकते.