>> कॉंग्रेस पक्षाला जबर धक्का
>> सांताक्रुझमधून पोटनिवडणूक लढविणार?
सांताक्रुझचे माजी आमदार तथा गेल्या विधानसभा निवडणुकीतील पणजीचे पडेल उमेदवार बाबूश मोन्सेर्रात यांनी काल संध्याकाळी गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश करून कॉंग्रेसला जबर धक्का दिला. त्यांच्या या प्रवेशामुळे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचाही पणजीतून निवडणूक जिंकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पोटनिवडणुकीत गोवा फॉरवर्डचा पर्रीकर यांना पाठिंबा असल्याचे सांगून यापुढे कोणत्याही मतदारसंघातून कॉंग्रेस आमदाराने राजीनामा दिल्यास त्या मतदारसंघात गोवा फॉरवर्ड उमेदवार उभा करणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
जलस्त्रोतमंत्री विनोद पालयेकर, गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर, पक्षाचे मुख्य प्रवक्ते ड्रॉजन डिमेलो, मोहनदास लोलयेकर, प्रशांत नाईक, दुर्गादास कामत यांच्या उपस्थितीत मोन्सेर्रात यांना सरदेसाई यांनी नारळ देऊन पक्षात प्रवेश दिला. बाबूश यांच्या गोवा फॉरवर्डमधील प्रवेशाने कॉंग्रेसला हादरा बसेल असा दावा करून कॉंग्रेसमध्ये आमदारांची संख्या किती आहे हे कॉंग्रेसलाही सांगता येणार नाही, असे सरदेसाई यांनी सांगितले. प्रादेशिक पक्ष म्हणून पक्षाचा विस्तार करण्याच्या हेतूनेच मोन्सेर्रात यांना पक्षात प्रवेश दिला. त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष बळकट होईल व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सरकारला स्थिरता प्राप्त होईल, असे सरदेसाई यांनी सांगितले.
पर्रीकर सरकार सर्वधर्मसमभावाचे तत्व पाळीत असून राज्यातील सामाजिक सलोखा, राज्याचा विकास नजरेसमोर ठेवून त्यांचे मार्गक्रमण चालू आहे. त्यामुळे गोवा फॉरवर्डने त्यांचे सरकार बळकट करण्याचा प्रयत्न केल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. आपल्या पक्षाने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता सरकार करीत असल्याचे ते म्हणाले. कॉंग्रेसने गोवा फॉरवर्डसमोर आपल्या पक्षात विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव दिला होता. आता कॉंग्रेसच गोवा फॉरवर्डमध्ये विलीन करण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. प्रादेशिक पक्षांना जनतेचा पाठिंबा आहे. दिल्लीवाल्यांची दादागिरी जनतेला नको आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले.
कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता
मोन्सेर्रात यांच्या वरील निर्णयामुळे कॉंग्रेस पक्षात चलबिचल झाली असून त्यांना आता पणजीतील पोटनिवडणुकीसाठी नवा उमेदवार शोधावा लागेल. मोन्सेर्रात यांनी पणजीतून निवडणूक लढवू नये म्हणून गेल्या बर्याच दिवसांपासन जोरदार प्रयत्न सुरू होते. निवडणूक न लढविता राहणे राजकीयदृष्ट्या मोन्सेर्रात यांना परवडणारे नव्हते. तसे केले असते तर त्यांच्यावर भाजपकडे ‘सेटिंग’ केल्याचा ठपका बसला असता. गोवा फॉरवर्ड पर्रीकर सरकारचा घटक असल्याने मोन्सेर्रात यांनी पणजीतून निवडणूक लढविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे सापही वाचला व काठीही वाचली, असे मोन्सेर्रात यांचे वरील पक्ष प्रवेशामुळे झाले आहे, अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी मोन्सेर्रात यांनी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. परंतु मंत्री सरदेसाई यांनी पर्रीकर सरकारचा पाठिंबा काढून घेण्यास नकार दिल्याने मोन्सेर्रात यांचे प्रयत्न असफल झाले होते.
टॉनी राजीनामा देण्याच्या तयारीत
दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार सांताक्रुझचे कॉंग्रेस आमदार टॉनी फर्नांडिस मोन्सेर्रात यांना निवडणूक लढविण्यासाठी जागा रिक्त करून देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासंबंधिचा निर्णय लवकर होण्याची शक्यता आहे. फर्नांडिस यांनी राजीनामा दिल्यास पणजी, वाळपई व सांताक्रुझ या तिनही मतदारसंघातील पोटनिवडणूक एकाचवेळी होण्याची शक्यता आहे.
कॉंग्रेसकडे खंबीर नेतृत्व नाही ः बाबूश
कॉंग्रेस पक्षात एकही सक्षम व खंबीर नेता राहिलेला नाही. त्यामुळेच आपण गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केला. पक्षनेते विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास असून ते किती सक्षम आहेत हे त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे. कॉंग्रेस पक्षाचे १७ उमेदवार निवडून येऊनही त्यांना सरकार स्थापन करता आले नाही, असे मोन्सेर्रात यांनी सांगितले. आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी आपण कुणावरही दबाव आणणार नसल्याचे मोन्सेर्रात यांनी सांगितले.