बाबूशनी केलेल्या मनोहर पर्रीकरांवरील टीकेचे तीव्र पडसाद

0
27

महसूलमंत्री, पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी देशाचे माजी संरक्षणमंत्री, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर केलेल्या टीकेचे तीव्र पडसाद समाज माध्यमाबरोबर राजकीय पातळीवर उमटू लागले आहेत.

माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यावर करण्यात आलेली टीका निंदनीय आहे, असे भाजपचे प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे. वेर्णेकर यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये पर्रीकर यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. आज माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यावर टीका करणाऱ्यांनी त्यांच्या काही गुणांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे भाजपचे वेर्णेकर यांनी म्हटले आहे. पर्रीकर यांच्या कार्यात व्यापक नियोजन आणि काळजीपूर्वक विचारांचा समावेश होता. पणजी शहरासाठी त्यांनी दिलेले मोठे योगदान पूर्णपणे समजून घेण्यासाठी एखाद्याला शासनाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी पर्रीकर यांच्या काही गुणांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे वेर्णेकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी स्मार्ट सिटीतील विकासकामाबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री मोन्सेरात यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना मंत्री मोन्सेरात यांनी दिवंगत माजी संरक्षणमंत्री पर्रीकर यांच्यावर टीका केली होती.

मागील पंचवीस वर्षांत पर्रीकर यांनी काहीच केले नाही. मनोहर पर्रीकरांच्या कर्माची फळे पणजीवासीय भोगत आहेत. विकासकामांसाठी सल्लागाराच्या नियुक्तीला सुरुवात करून वाईट पायंडा घातला. पणजी स्मार्ट सिटीच्या सल्लागारामुळे विकासकामे रखडली आहेत. त्याचा त्रास पणजीवासीयांना सहन करावा लागत आहे, असा आरोप मोन्सेरात यांनी केला होता.

कॅसिनोप्रमाणे स्मार्ट सिटीचे आश्वासन विरू नये ः उत्पल

पणजी स्मार्ट सिटीतील रखडलेल्या कामाबाबत आवाज उठविल्यानंतर सरकारी यंत्रणा जागी झाली आणि उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत याचा मला जास्त आनंद झाला आहे. आता, स्मार्ट सिटीतील कामे पूर्ण करण्यासाठी 31 मे ही तारीख जाहीर करण्यात आली आहे. पणजीतील कॅसिनो 100 दिवसात बंद करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ते आश्वासन हवेत विरले आहे. स्मार्ट सिटीतील विकासकामे 31 मेपर्यंत पूर्ण करण्याच्या आश्वासन देण्यात आले आहे. कॅसिनोप्रमाणे स्मार्ट सिटीच्या आश्वासन हवेत विरले जाऊ नये, असे उत्पल पर्रीकर यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याबाबत काय विचार करतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पर्रीकर यांचे कार्य गोमंकातील जनतेला माहीत आहे. बाबूश मोन्सेरात काय म्हणतात याला काहीच महत्त्व नाही. बाबूश मोन्सेरात काय बोलतात ते त्यानांच माहीत नाही, असेही उत्पल पर्रीकर यांनी म्हटले आहे.