पणजी पोट निवडणुकीतील कॉंग्रेसचे उमेदवार बाबुश मोन्सेर्रात यांना निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत आणण्यासाठी कथित बलात्कार प्रकरणातील युवतीला गायब करण्यात आल्याचा संशय गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कॉंग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल व्यक्त केला.
भाजप केवळ सत्ता टिकवून ठेवण्यासाठी कुठल्याही थरावर जाऊ शकतो. यापूर्वी सत्ता टिकवून ठेवण्यासाठी अनेक गैरव्यवहार केलेले आहेत. कथित बलात्कार प्रकरणातील पीडित युवती बेपत्ता होण्यासाठी सरकार आणि गृह खाते जबाबदार आहे, असा दावा अध्यक्ष चोडणकर यांनी केला. सदर युवती शिक्षण घेते असल्याने तिला दक्षिण गोव्यातील एका आश्रमात ठेवण्यात आले होते. पीडित युवती यापूर्वी चार वेळा आश्रमातून गायब झाली होती. त्यावेळी मोठा गाजावाजा करण्यात आला नव्हता. आता, पोट निवडणुकीच्या तोंडावर युवतीच्या गायब होण्याबाबत गाजावाजा केला जात आहे, असेही चोडणकर यांनी सांगितले.
राजकीय व्यक्ती गुंतल्याने कथित बलात्कार प्रकरण हा संवेदनशील विषय आहे. परंतु, सरकार पीडित युवतीला योग्य सुरक्षा पुरविण्यात अपयशी ठरले आहे. भाजपने पीडित युवतीच्या गायब प्रकरणाचा निवडणुकीत लाभ उठविण्यासाठी प्रयत्न चालविला आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला.
सखोल चौकशी करा : भाजप
पणजी विधानसभा पोट निवडणुकीतील कॉंग्रेसचे उमेदवार बाबुश मोन्सेर्रात यांच्या विरोधातील कथित बलात्कार प्रकरणातील पीडित युवती गायब प्रकरणाची सरकारने सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी पत्रकार परिषदेत काल केली. पीडित युवती दक्षिण गोव्यातील एका आश्रमातून बेपत्ता झालेली आहे. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पीडित युवतीला शोधून काढावे. सदर युवतीचे अपहरण केले जाऊ शकते. या प्रकरणी सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी तेंडुलकर यांनी केली.