बाबा सिद्धिकी हत्याप्रकरणातील तीन संशयित आरोपींना अटक

0
8

>> एकास पोलीस कोठडी, एकाचा शोध सुरू

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर राज्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. सिद्दिकी यांच्या हत्येमागे बिश्नोई गँगचा हात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

चौथ्या आरोपीची ओळख पटली
एनएनआयने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, चौथ्या आरोपीचे नाव मोहम्मद जीशान अख्तर आहे. तो 7 जून रोजी पटियाला तुरुंगातून जामिनावर बाहेर आला आहे. पटियाला तुरुंगातच तो लॉरेन्स बिश्नोई टोळीतील लोकांच्या संपर्कात आला होता. मोहम्मद जीशान अख्तर हा पंजाबमधील जालंधरचा रहिवासी असल्याची माहिती आहे.

दरम्यान, तिसरा आरोपी प्रवीण लोणकर याला काल उशिरा अटक केली आहे. अन्य आणखी एका आरोपीची ओळख पटली असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण शाखेची 15 पथके गुन्ह्याचा तपास करत आहेत. फरारी आरोपी परराज्यात पळून गेल्याचा संशय असून पोलिसांचे पथक परराज्यातही गेले आहे.

आरोपीकडून हत्यारे जप्त
पोलिसांनी सांगितले की, आरोपींकडून 2 पिस्तूल आणि 28 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. आरोपींकडे मिरचीचा स्प्रेदेखील सापडला आहे. आरोपी आधी मिरचीचा स्प्रे बाबा सिद्धिकी यांच्यावर फवारणार होते आणि ते खाली पडल्यावर त्यांच्यावर गोळीबार करणार होते. परंतु संशयितांपैकी एकाने थेट सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केल्याने त्यांनी प्लान बदलला, असे डीसीपी नलावडे यांनी सांगितले.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या पार्थिवावर काल रविवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबा सिद्दिकी यांचे पार्थिव त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानातून स्मशानात नेण्यात आले.

यावेळी त्यांच्या समर्थकांचा मोठा जनसमुदाय उपस्थित होता. मुस्लिम रितीरिवाजांनुसार बडा कब्रस्तान येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबा सिद्दिकी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्यांना मुंबई लाईनमधील बडा कब्रिस्तानमध्ये दफन करण्यात आलं. याआधी त्यांना शासकीय सन्मान देण्यात आला होता.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केवळ कुटुंबीयांनाच स्मशानभूमीत प्रवेश देण्यात आला. यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल दफनविधीला उपस्थित होते.

एका आरोपीला पोलीस कोठडी

याप्रकरणी गुरुमीत सिंग आणि धर्मराज कश्यप यांना काल सकाळी अटक केली होती. त्यांना काल न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने गुरुमीत सिंगला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर धर्मराज कश्यप याची हाडासंदर्भातली एक चाचणी करण्यात येणार आहे. आरोपी धर्मराज कश्यपने त्याचे वय न्यायालयात 17 वर्षे सांगितल्यामुळे न्यायालयाने याप्रकरणी त्याच्या वय निश्चितीसाठी हाडांची चाचणी करण्यासंबंधीचे निर्देश दिले आहेत.