>> सीबीआय विशेष न्यायालयाचा निकाल
१९९२ मध्ये बाबरी ढॉंचा पाडल्याप्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने काल या प्रकरणी निकाल दिला. बाबरी ढॉंचा पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता तर ती अचानक घडलेली घटना असल्याचे निरीक्षण यावेळी न्यायालयाने मांडले. विश्व हिंदू परिषदेने यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणतीही भूमिका बजावली नाही. अज्ञात लोकांनी पाठीमागून दगडफेक केल्याचं निदर्शनात आल्याचे न्यायालयाने सांगितले. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. या प्रकरणात भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आरोपी होते.
आरोपींमध्ये उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, विनय कटियार, साध्वी ऋतंबरा यांचाही समावेश आहे. या प्रकरणाचा तपास करणार्या सीबीआयने न्यायालयापुढे ३५१ साक्षीदार आणि सुमारे ६०० कागदपत्रे पुरावा म्हणून सादर केले होते.
४८ जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते मात्र त्यापैकी १६ जणांचा खटला सुरू असताना मृत्यू झाला होता. हा ढॉंचा पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचले आणि कारसेवकांना ढॉंचा पाडण्यासाठी फूस लावली असा सीबीआयचा युक्तिवाद होता.
दरम्यान, न्यायालयात निकाल सुनावला जात असताना लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंह, सतीश प्रधान आणि महंत नृत्यगोपाल दास यांच्याव्यतिरिक्त सर्वजण उपस्थित होते. अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली होती. तर उमा भारती यांना कोरोनाची लागण झाली असून, त्या सध्या उत्तराखंड येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. एकूण २६ आरोपी यावेळी न्यायालयात हजर होते.
हा सत्याचा
विजय ः मुख्यमंत्री
बाबरी ढॉंचाप्रकरणी सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष सुटका केल्यानंतर हा सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्विटद्वार व्यक्ते केली आहे. प्रदेश भाजपाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी, सत्याचा विजय झाल्याचे म्हटले आहे. खासदार विनय तेंडुलकर यांनीही या निकालाप्रकरणी आनंद व्यक्त केला आहे.
सत्य पराभूत होत
नाही ः श्रीपाद
दरम्यान, केंद्रिय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी, सत्य त्रासदायी असू शकते पण ते पराभूत होऊ शकत नाही असे सांगत या निवाड्यावर आनंद व्यक्त केला.