बापलेकीत फूट

0
4

राजकारणामध्ये कोणी कोणाचा नसतो. अगदी रक्ताची नाती देखील सत्ता आणि संपत्तीखातर विसरली जातात, माणसे एकमेकांच्या उरावर बसायला देखील कमी करीत नाहीत. ह्याच परंपरेतील नवा अध्याय सध्या तेलंगणात सुरू आहे. तेलंगणाच्या भारत राष्ट्र समितीचे नेते व माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता हिला तिच्याच वडिलांनी पक्षातून नुकतेच निलंबित केले. त्यानंतर तिने आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत आरोपांची फैर लगावली आहे. सत्ता आणि संपत्तीपुढे नातीगोती दुय्यम ठरतात हे देशाने सर्वांत आधी इंदिरा गांधी विरुद्ध मनेका प्रकरणात तीव्रतेने अनुभवले. सासू – सुनेच्या ह्या भांडणातून घराबाहेर काढल्या गेलेल्या मनेकांनी नंतर विरोधी पक्षाची कास धरून केंद्रात मंत्रिपद मिळवले हा भाग वेगळा. भारतीय राजकारणाला घराणेशाहीची कीड तर खूप आधीपासून लागलेली आहे. त्यातूनच प्रसंगी राजकीय वैरही निर्माण होत असते. महाराष्ट्रातील ठाकरे, पवार यांच्यासारख्या मातब्बर राजकीय घराण्यांमध्ये निर्माण झालेला कलह आपण पाहिलाच आहे. राजकारणापोटी घरे फुटताना दिसतात. राजकारणापोटी मुलगा बापाचे ऐकत नाही, भाऊ भावाचा वैरी होतो, मुलगी पित्याला जुमानत नाही अशी असंख्य उदाहरणे आहेत. राजमाता विजयाराजे शिंदे आणि पुत्र ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात एकेकाळी जोरदार राजकीय संघर्ष होता. त्या भारतीय जनसंघ आणि नंतर भाजपच्या नेत्या होत्या, तर पुत्र ज्योतिरादित्य काँग्रेसच्या तरुण तुर्कांत सामील झाले होते. आज तेही भाजपात आहेत. उत्तर प्रदेशचे समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांच्या वारशावरून त्यांचे बंधू शिवपाल यादव आणि पुत्र अखिलेश यादव यांच्यात मोठी धुमश्चक्री झाली होती. अगदी पक्षाचे निवडणूक चिन्ह हस्तगत करण्यापर्यंत तो संघर्ष तेव्हा विकोपाला गेला होता. त्या भांडणामुळेच पक्षाने 2017 ची विधानसभा निवडणूक तेव्हा गमावली. कर्नाटकात देवेगौडांचे दोन्ही पुत्र कुमारस्वामी आणि रेवण्णा यांच्यातील राजकीय संघर्षही सर्वज्ञात आहे. तामीळनाडूमध्येही स्टॅलिन आणि अलागिरी ह्या करुणानिधींच्या दोन्ही पुत्रांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष उफाळला होता. इतका की कलानिधी मारन यांच्या वृत्तपत्राने स्टॅलिन यांना लोकप्रियतेचा कौल दिला, तर त्या वर्तमानपत्राच्या कार्यालयावरच हल्ला चढवला गेला होता. शेवटी अलागिरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आणि स्टॅलिन यांनी पक्षावर वर्चस्व मिळवले. आज ते तामीळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी आहेत. हरियाणात देविलाल यांचे दोन्ही पुत्र अभय चौटाला आणि अजय चौटाला यांच्यात विस्तव जात नाही. आंध्रमध्ये राजशेखर रेड्डी यांचे पुत्र जगन्मोहन रेड्डी आणि कन्या शर्मिला यांच्यात हाडवैर आहे. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांनी आपला मोठा मुलगा तेजप्रताप यादव याची अलीकडेच पक्षातून हकालपट्टी केली होती. आणि आता बीआरएसमधून के. कविता यांचे निलंबन झाले आहे. त्यांचा तर त्यांचा सख्खा भाऊ आणि पक्षाचा कार्याध्यक्ष के. रामाराव याच्याविरुद्धच संघर्ष आहे. आपला आत्तेभाऊ आणि पक्षाचा एक नेता व माजी मंत्री हरीश राव याच्यावर तर त्यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. कालेश्वरम प्रकल्पामध्ये कोट्यवधीची लाच घेतली गेल्याचे आणि त्या पैशातून पक्षाच्या आमदारांना आपल्या कह्यात ठेवले जात असल्याचा आरोप के. कविता यांनी केला आहे. कविता यांच्या आरोपांमुळे काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंतरेड्डी यांनी बीआरएस नेत्यांची सीबीआय चौकशी लावली आहे. त्यामुळे पित्याला आपल्या कन्येला रोखण्यासाठी पक्षातून हाकलणे भाग पडले. गेला जवळजवळ महिनाभर हा राजकीय तमाशा तेलंगणात चालला होता. कविता ह्या काही तशा लेच्यापेच्या नव्हेत. आम आदमी पक्षाशी संबंधित मद्य घोटाळ्यात त्याही एक आरोपी होत्या आणि त्यांना वर्षभर तुरुंगवासही झाला आहे. चंद्रशेखर राव यांनी के. कविता यांना निलंबित केले, तरी तिने आपल्या पित्याला टीकेचे लक्ष्य केलेले दिसत नाही. पक्षातील काही नेते पक्ष कमकुवत करीत आहेत, आतून पोखरत आहेत आणि अशावेळी आपल्या वडिलांची काळजी घ्यावी अशी भावनिक साद कविता यांनी बंधू रामाराव यांना पत्रकार परिषदेतून नुकतीच घातली. पक्षामध्ये आपली कोंडी केली जात होती, आपल्याविरुद्ध कारस्थाने होत होती, महत्त्वाच्या पदांपासून आपल्याला सातत्याने दूर ठेवले जात होते वगैरे वगैरे आरोप कविता यांनी केले आहेत. आपण आपली तक्रार सख्ख्या भावापाशी मांडली, परंतु त्यानेही मौन पाळल्याने आपण काय ते समजून चुकले असेही कविता म्हणत आहेत. बीआरएसमध्ये त्यामुळे उभी फूट पडण्याचे संकेत आहेतच, परंतु केवळ राजकारणापोटी आणखी एक घर फुटले आहे.