>> मारहाणीत एक जखमी : ५ दुचाक्या जाळल्या
बाणावली येथे मंगळवारी रात्री आयोजित कार्निव्हल मिरवणुकीदरम्यान जाळपोळ, हाणामारी यामुळे हिंसेचे गालबोट लागले. याबाबत वृत्त असे बाणावली येथील कार्निव्हल मिरवणुकीवेळी दोन गटांनी परस्परांवर प्राणघातक हल्ला चढवला. यावेळी पाच दुचाक्या जाळून खाक झाल्या. हिंसक वळण लागल्याने मिरवणुकीला गालबोट लागले.
याप्रकरणी पोलिसांनी १२ जणांवर गुन्हा नोंदविला आहे. यावेळी टोनी फर्नांडिस हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर इस्पितळात उपचार चालू आहेत. काल कार्निव्हलनिमित्त बाणावली येथील मारिया हॉल ते बीचपर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी टोनी फर्नांडिस याने एका महिलेला ढकलून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या महिलेने आपल्या पतीला हे सांगितल्यानंतर तो साथिदाराना घेवून घटनास्थळी पोहचला व त्यांनी टोनी फर्नांडिसला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याला हॉस्पिटलांत दाखल करण्यात आले.
मारहाण केलेले तरूण महिलेच्या पती पत्नीला घेवून कोलवा आपल्या घरी गेले. तेथे कार्निव्हलची पार्टी सुरु केली. ती ऐन रंगात आली असताना टोनी फर्नांडिस याचे मित्र कोलवा येथे गेले. तेथे दोन्ही गटात शिवीगाळ करून धमकी दिली. त्यानंतर संतापलेल्या दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर हल्ले केले. बाहेर असलेल्या मोटर सायकलींना आग लावली. त्यांत पाच मोटरसायकली जळून खाक झाल्या. पाच पैकी चार मोटरसायकली बाणावली येथील गटाच्या तर एक कोलवा येथील आहे. पोलीस पोहचताच ते पळून गेले. पोलिसांनी धमकी देणे, अतिप्रसंग करणे, घरी जावून मारहाण, दुचाक्या जाळणे याप्रकरणी चार गुन्हे नोंद केले आहेत.