बाणस्तारी अपघात : महिलेला अटक करा

0
11

>> 300 नागरिकांची म्हार्दोळ पोलीस स्थानकावर धडक; प्रश्नांचा भडिमार; अटकेसाठी आज दुपारपर्यंतची मुदत; अन्यथा मोर्चा

बाणस्तारी अपघातावेळी महिलाच मर्सिडीज कार चालवत होती. त्यामुळे तिच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून तिला ताबडतोब अटक करावी, या मागणीसाठी काल दिवाडी आणि कुंभारजुवेतील नागरिकांनी म्हार्दोळ पोलीस स्थानकावर धडक दिली. जवळपास 300 च्या आसपास संख्येने जमलेल्या नागरिकांनी पोलिसांवर प्रश्नांचा भडिमार केला. सदर महिलेला अटक करण्यासाठी बुधवारी दुपारी 12 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली असून, त्या मुदतीत अटक न झाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी दिला. नागरिकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांनी बुधवार सकाळपर्यंत सदर महिलेच्या अटकेचे आश्वासन दिले.

बाणस्तारी येथील भीषण अपघातात तिघांचा बळी गेला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात बळी पडलेल्या दिवाडी येथील सुरेश फडते आणि भावना फडते या दाम्पत्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी स्थानिक दिवाडीवासीय एकटवले असून, फडते कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा काल सकाळी स्थानिकांनी दिला. तेवढ्यावरच न थांबता सायंकाळी 7 नंतर दिवाडीतील नागरिकांनी म्हार्दोळ पोलीस स्थानकावर धडक दिली.
या अपघात प्रकरणाच्या तपासाबाबत स्थानिक दिवाडीवासींयानी संशय व्यक्त केला असून, या प्रकरणामध्ये हाय प्रोफाईल व्यक्ती गुंतल्याने पोलीस यंत्रणेकडून प्रकरण दाबले जाण्याची शक्यता दिवाडीवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.

पोलीस स्थानकावर धडक दिलेल्या नागरिकांसमवेत कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक, आपच्या नेत्या प्रतिमा कुतिन्हो आणि सामाजिक कार्यकर्ते हजर होते. यावेळी नागरिक व नेत्यांनी म्हार्दोळ येथे फोंडा विभागीय पोलीस उपअधीक्षक आशिष शिरोडकर, पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांची भेट घेत त्यांच्यावर बाणस्तारी अपघात प्रकरणाच्या तपासाबाबत प्रश्नांचा भडिमार केला. या अपघात प्रकरणी श्रीपाद उर्फ परेश सावर्डेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करून या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या महिलेला पाठीशी घालण्यात आले आहे, असा आरोप संतप्त नागरिकांनी केला. मर्सिडीज कारमधील त्या महिलेची वैद्यकीय चाचणी का करण्यात आली नाह़ी. तसेच, सदर सावर्डेकर कुटुंब खांडेपार येथील पार्टीमध्ये सहभागी होऊन पणजीला परतत होते. त्या कारचे फुटेज मिळविले आहे का? असा प्रश्न नागरिकांनी केला.

तपासाबाबत संशय कायम
बाणस्तारी अपघाताला कारणीभूत ठरलेली मर्सिडीज कार महिलाच चालवत होती, असा दावा करणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याशिवाय अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या जमावानेही महिलाच कार चालवत होती, असा दावा केला होता. मात्र पोलिसांनी हा दावा फेटाळत या अपघात प्रकरणी सदर महिलेचा पती परेश सावर्डेकर याला अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर तपासाबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अपघातावेळी चालक कोण?
प्रत्यक्षदर्शी दिग्विजय वेलिंगकर यांनी कार महिला चालवत असल्याचा दावा पत्रकारांशी बोलताना केला होता. तसेच, तिवरे-वरगावच्या सरपंचांनी सुध्दा कार महिला चालवत असल्याचा दावा केला होता. मात्र पोलिसांनी अन्य तीन प्रत्यक्षदर्शींच्या जबानीचा आधार घेत सदर कार परेश सावर्डेकरच चालवत असल्याचा दावा केला आहे.

अटकेतील मर्सिडीजचालकाला जामीन नाकारला
बाणस्तारी येथील भीषण अपघात प्रकरणी अटक केलेल्या मर्सिडीजचालक श्रीपाद ऊर्फ परेश सिनाई सावर्डेकर याचा जामीन अर्ज फोंडा उत्तर गोवा जिल्हा न्यायालयाने काल फेटाळून लावला. बाणस्तारी येथे महामार्गावर रविवारी झालेल्या या अपघात प्रकरणी मर्सिडीजचालक परेश सावर्डेकर याला अटक करून दोन दिवसांचा रिमांड घेण्यात आला आहे. परेश सावर्डेकर याने फोंडा उत्तर गोवा जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. यावेळी पोलिसांनी जोरदार युक्तिवाद करत जामीन नाकारण्याची मागणी केली. परेश सावर्डेकर हा मद्याच्या नशेत भरधाव, निष्काळजीपणे वाहन चालवून गंभीर अपघाताला कारणभूत ठरला आहे. त्याला मागील दोन महिन्यांत एआय सीसीटीव्ही कॅमेऱ्याने सात वेळा ओव्हर स्पीड प्रकरणी टिपलेले आहे, असा युक्तिवाद पोलिसांच्यावतीने न्यायाल़यात करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने परेश सावर्डेकरचा जामीन फेटाळला.

बाणस्तारी येथील भीषण अपघात प्रकरणी पोलीस कसून तपास करीत आहेत. पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.

  • डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

महिला मर्सिडीज कार चालवत होती; प्रत्यक्षदर्शी वेलिंगकर जबानीवर ठाम

बाणस्तारी अपघातावेळी मर्सिडीज कार महिलाच चालवत होती, अशी जबानी प्रत्यक्षदर्शी दिग्विजय वेलिंगकर यांनी काल म्हार्दोळ पोलिसांसमोर नोंदवली. तसेच या प्रकरणी त्यांनी स्वतंत्र लेखी तक्रार दाखल केली असून, त्यातही अपघात घडला त्यावेळी महिलाच मर्सिडीज कार चालवत असल्याचे नमूद केले असून, त्यांनी एक प्रकारे पोलिसांचा एफआयआरलाच आव्हान दिले आहे. त्यामुळे अपघातावेळी नेमकी कोणती व्यक्ती कार चालवत होती, याबाबतचा संभ्रम वाढला आहे.

बाणस्तारी भीषण अपघाताचे प्रत्यक्षदर्शी दिग्विजय वेलिंगकर यांना काल म्हार्दोळ पोलीस स्थानकात बोलावून घेत त्यांची जबानी काल नोंदवून घेण्यात आली. आपण अपघातानंतर केलेल्या त्या विधानावर ठाम आहे. आपण पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे. आपण अपघातस्थळी पोहोचलो, तेव्हा कार चालकाच्या सीटवर महिलाच होती. आपण पणजी येथून म्हार्दोळला येताना हा अपघात झाला, असे वेलिंगकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.