बाणस्तारी अपघात प्रकरणी परेश सावर्डेकर याची पत्नी मेघना सावर्डेकर व तिच्या एका मुलाची काल सुमारे तीन तास फोंडा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबानी नोंदवून घेण्यात आली.
या अपघात प्रकरणाचा तपास सध्या गुन्हा अन्वेषण पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे, तरी म्हार्दोळ पोलिसांनी मेघना व तिच्या तीन मुलांची न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबानी नोंद व्हावी, यासाठी अर्ज केला होता. न्यायदंडाधिकाऱ्यांनी मेघना व तिच्या एका मुलाची जबानी घेण्यासाठी 21 ऑगस्ट, तर इतर दोघांची जबानी घेण्यासाठी 23 ऑगस्ट अशी तारीख दिली होती.
न्यायदंडाधिकाऱ्यांनी पाठवलेली नोटीस कालच मेघना व तिच्या मुलांना देण्यात आली होती. मेघना हिने ही नोटीस मिळताच काल मुलांसह फोंड्यात न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजेरी लावली. दुसऱ्या बाजूला कारचालक परेश सावर्डेकर याच्या जामिनावरील सुनावणी काल उच्च न्यायालयाने पुढे ढकलली. आता ही सुनावणी 24 ऑगस्ट रोजी होणार आहे.