>> मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; आमदार फळदेसाईंनी मृत फडते दाम्पत्याच्या नातेवाईकांसह घेतली भेट
कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांच्या नेतृत्वाखाली बाणस्तारी अपघातात बळी पडलेल्या फडते दाम्पत्याचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची काल भेट घेतली. त्यांनी म्हार्दोळ पोलिसांकडून बाणस्तारी अपघात प्रकरणी सुरू असलेल्या तपास कामाबाबत असमाधान व्यक्त करून हा तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडे (क्राईम ब्रांच) सुपूर्द करण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बाणस्तारी अपघात प्रकरणाचे तपासकाम गुरुवारी गुन्हा अन्वेषण विभागाकडे सुपूर्द करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार राजेश फळदेसाई यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.
दिवाडी गावातील सुरेश फडते आणि भावना फडते या दाम्पत्याचा या अपघातात बळी गेला आहे. त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी नागरिक एकजूट झाले आहेत, असे राजेश फळदेसाईंनी सांगितले.
बाणस्तारी अपघाताचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून चुकीची माहिती दिली जात आहे. गेल्या 8 ऑगस्ट रोजी ग्रामस्थ म्हार्दोळ पोलीस स्थानकावर गेले होते. त्यावेळी मर्सिडीज कारच्या मालक मेघना सावर्डेकर हिला 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत अटक करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. 9 ऑगस्ट रोजी मेघना सावर्डेकर हिने फोंडा येथील न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यावेळी पोलिसांनी मेघना हिची जबानी नोंदवून घेतल्याचे स्पष्ट झाले; मात्र त्यापूर्वी 8 ऑगस्ट रोजी मेघना सावर्डेकर घरी सापडल्या नाहीत, अशी माहिती पोलिसांनी ग्रामस्थांना दिली होती, असे फडते दाम्पत्याच्या नातेवाईकांनी
सांगितले.
बाणस्तारी अपघात प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली निःपक्षपाती चौकशी करण्याची मागणी केली जाणार आहे. तसेच, या अपघात प्रकरणातील संशयित परेश सावर्डेकर, कारच्या मालक मेघना सावर्डेकर व कारमधील इतरांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली जाणार आहे, असेही फडते दाम्पत्याचे नातेवाईक आणि राजेश फळदेसाई यांनी भेटीनंतर सांगितले.
मेघनाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 23 रोजी सुनावणी
बाणस्तारी अपघातास जी मर्सिडीज कार कारणीभूत ठरली होती, त्या कारच्या मालक मेघना सावर्डेकर हिला आणखी काही दिवस दिलासा दिला असून, तिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता 23 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. अपघातावेळी मेघना सावर्डेकर हीच कार चालवत असल्याचा दावा काही प्रत्यक्षदर्शी आणि अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी केला होता. तसेच मेघना हिच्या अटकेसाठी पोलीस यंत्रणेवर दबाव आणला होता. त्यानंतर मेघना सावर्डेकर हिने फोंडा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. काल न्यायालयात तिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. या प्रकरणी पुढील सुनावणीपर्यंत न्यायालयाने तिला अटकेपासून तात्पुरता दिलासा दिला आहे. दरम्यान, या अपघात प्रकरणी अटक केलेल्या परेश सावर्डेकर याची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
म्हार्दोळ पोलिसांवर विश्वास नाही
म्हार्दोळ पोलिसांकडून बाणस्तारी येथील अपघात प्रकरणाचे तपासकाम योग्य पद्धतीने केले जात नाही. आम्ही अपघाताच्या तपासकामाबाबत समाधानी नाही. फोंडा येथील विभागीय पोलीस अधिकारी आणि म्हार्दोळ पोलीस निरीक्षक यांच्यावर आमचा विश्वास नाही. या अपघात प्रकरणाचा योग्य दिशेने तपास करण्यासाठी गुन्हा अन्वेषण विभागाकडे तपासकाम सोपवावे, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे करण्यात आली आहे, असे फडते दाम्पत्याचे नातेवाईक आणि राजेश फळदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सांगितले.