बाजारपेठांत सामसूम

0
75

दीड दिवसाच्या गणपतींचे परवा विसर्जन झालेले असतानाही काल राजधानीसह गोव्यातील सर्व प्रमुख शहरांतील बाजारपेठात सामसूम होती. पणजी, मडगाव, वास्कोसह अन्य शहरातील बहुतेक रेस्टॉरन्ट्‌स, खानावळी, चहाची दुकाने काल बंदच होती. बाजारपेठातील बहुतेक दुकाने बंद दिसत होती. बाजारात लोकांची उपस्थितीही अगदीच अल्प दिसत होती.
रेस्टारन्ट्‌स, खानावळी येथे काम करणारे वेटर्स व अन्य कामगार चतुर्थीनिमित्त महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक आदी राज्यांतील आपल्या गावी गेल्याने रेस्टॉरन्ट्‌स, खानावळी बंद राहिल्या. मोजकीच काही रेस्टॉरन्ट्‌स व खानावळी उघड्या होत्या. त्यामुळे पावसाळी पर्यटकासाठी आलेल्या लोकांचे व नोकरीनिमित्त शहरात आलेल्या लोकांचे जेवणाभावी हाल झाले. पुढील दोन-तीन दिवस ही स्थिती अशीच राहण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
पोलिसांवर गस्तीची जबाबदारी असल्याने त्यांना सुटी मिळू शकली नाही. त्यामुळे बहुतेक पोलिसांनी पोलीस स्थानकावरच चतुर्थी साजरी केली. ज्यांची घरे पोलीस स्थानकापासून जवळ आहेत अशा काही पोलिसांनी आरतीच्यावेळी घरी जाऊन आरतीत भाग घेतला व भोजनानंतर पोलीस स्थानकात हजेरी लावली.