बागुलबुवा

0
16

लोकपरंपरेत ‘बागुलबुवा’ नावाच्या एका काल्पनिक पात्राची मुलांना भीती घातली जाते. सध्या गोव्यामध्ये चर्चशी संबंधित व्यक्ती अशीच भीती ख्रिस्ती समाजामध्ये पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘मणिपूर झाले, आता पुढची पाळी गोव्याची असेल’ असा त्यांचा एकंदर सूर आहे. असे गोव्यात एकाएकी काय घडले आहे की त्यांना येथील हिंदू समाजाची भीती वाटावी? देशामध्ये सध्या विद्वेषाचे राजकारण जोरात आहे हे खरे. मणिपूरपासून हरियाणापर्यंत त्याचे भीषण परिणामही दिसून आले आहेत. अल्पसंख्यक समाजामध्ये असुरक्षितता निर्माण होते आहे, अनेकदा त्याच समुदायाच्या नेत्यांकडून मुद्दामहून ती निर्माण केली जाते. त्यातून खरोखरच वाटणारी ही भीती आहे की शांतताप्रिय गोमंतकीय ख्रिस्ती समाजाला जाणीवपूर्वक दिली जाणारी ही चिथावणी आहे? चर्चमध्ये काही फादरनी असे चिथावणीखोर सेर्मांव देण्याचे प्रकार अलीकडे घडले. आर्चडायोसीस ऑफ गोवाच्या ‘नवसोरणी’ म्हणजे ‘पुनरुत्थान’ या अर्थाचे नाव असलेल्या मुखपत्राच्या ताज्या अंकातही मणिपूरकडे बोट दाखवीत एक लेख प्रसिद्ध झाला आहे. ‘धिंड काढली जाईल, तयार रहा, आपले कपडे वाचवा’, ‘चर्चेस पाडल्या जातील, धर्मगुरूंना बडवले जाईल, कुटुंबाची काळजी घ्या’ असे हा लेख म्हणतो. ही असुरक्षिततेची भीती वाटत नाही, ही सरळसरळ चिथावणी वाटते आणि त्याची कारणेही निव्वळ राजकीय दिसतात, कारण हाच लेख म्हणतो, ‘एका रात्रीत गायब झालेल्या पक्षांना मत दिल्यानेच ही पाळी आपल्यावर ओढवली आहे. आपल्या राजकीय मूर्खपणाचे हे फळ आहे.’ ‘धर्मनिरपेक्ष पक्षा’ला मतदान केले जावे असे या लेखाचे एकूण सार आहे. याचा रोख कोणालाही कळण्यासारखा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष असे पक्ष अवतरले. काँग्रेसची बरीच मते या पक्षांना गेली. ख्रिस्ती मते विभागली गेली आणि त्याचा परिणाम म्हणून भारतीय जनता पक्षाला नावेलीसारख्या ख्रिस्तीबहुल मतदारसंघात देखील वाव मिळू शकला. ही अस्वस्थता आणि जवळ येणारी लोकसभा निवडणूक यामुळेच हे ख्रिस्ती मतपेढी एकवटण्याचे प्रयत्न चाललेले असावेत. प्रचारशास्त्रामध्ये आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ समर्पक दाखले दिले तर ते म्हणणे पटण्याचा अधिक संभव असतो. दुर्दैवाने अशा दाखल्यांचीही आपल्याकडे कमी नाही. पोर्तुगीज वारसा पुसून टाकण्याची राज्य सरकारची घोषणा, कळंगुटमधील शिवपुतळ्याचे झालेले राजकारण, असे दाखले या लेखात देण्यात आले आहेत. ‘पोर्तुगिजांच्या खाणाखुणा नष्ट करू’ असे मुख्यमंत्री म्हणाले, तेव्हा ‘त्याबाबत दिखाऊ अभिनिवेश नव्हे, तारतम्य हवे आहे.’ असा सावधगिरीचा इशारा आम्ही दिला होता व ‘त्यामागचा हेतू शुद्ध असावा. धार्मिक ध्रुवीकरणाचा आणि त्यातून मतांचा स्वार्थी हिशेब नसावा.’ अशी अपेक्षाही व्यक्त केलेली होती. कळंगुटला शिवपुतळ्याचे राजकारण झाले, तेव्हाही ‘शिवपुतळ्याचे हे जे राजकारण झाले, ते त्या भागामध्ये धार्मिक ध्रुवीकरण घडवून राजकीय ईप्सिते साध्य करण्याच्या एखाद्या षड्यंत्राचा भाग आहे का’ असा प्रश्न आम्ही केला होतेे. विवेक जागा असलेल्या प्रत्येकाच्या मनात तेव्हा हाच प्रश्न डोकावला होता. फादर बोल्मेक्स परेरा यांच्या आक्षेपार्ह विधानाबाबतही आम्ही हेच विचारू इच्छितो. ‘शिवाजी महाराज हे नायक आहेत, परंतु ते देव नव्हेत’ असे हे महाशय म्हणाले. शिवाजी महाराज हे भारतीयांसाठी राष्ट्रपुरुष तर आहेतच, परंतु त्यांच्या निष्कलंक चारित्र्यामुळे त्यांना दैवताचे स्थान प्राप्त झालेे आहे. ज्यांच्या जीवनात परमोच्च नैतिक आदर्श दिसतात, त्यांना कालांतराने देवत्व प्राप्त होत असते. त्यात वावगे काय? राम आणि कृष्ण हे आपले राष्ट्रपुरुष, परंतु त्यांना देवत्व प्राप्त झालेले आहे. येशू ख्रिस्ताच्या बाबतीतही हेच नाही काय? 32 मणांचे सोन्याचे सिंहासन असलेल्या, परंतु सुती वस्त्रांनिशी लाकडी पलंगावर निजणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे अवघ्या 50 वर्षांचे आयुष्य निष्कलंक चारित्र्याचा आदर्श आहे. अशा लोकोत्तर पुरुषाच्या नावे थयथयाट करण्याचा या उपसुंभांना अधिकारच काय? धर्मोपदेशाच्या अवगुंठनात राजकीय उपदेश करण्याचा चर्चचा सतत प्रयास असतो. त्यांची ती खोड जुनीच आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी खुद्द आर्चबिशपनी आपल्या ‘पॅस्टोरल’ पत्रात ‘संविधान रक्षणार्थ उभे राहा’ असे म्हणत सरळसरळ राजकीय प्रचार चालवला होता. केवळ आपला प्रभाव टिकवण्यासाठी राजकारणात लुडबूड करीत आलेल्या चर्चने गोव्याच्या शांतताप्रेमी आणि भावूक वृत्तीच्या ख्रिस्ती समाजाला मणिपूरचा बागुलबुवा दाखवणे त्वरित थांबवावे. धर्म आणि राजकारण यांची गल्लत घातकच ठरेल, मग ती कोणीही का करीत असेना!