बागातील संरक्षक भिंत मोडल्याप्रकरणी विधानसभेत आवाज उठवणार : आ. लोबो

0
126
बागा येथील सभेत बोलताना आमदार मायकल लोबो. (छाया : प्रणव फोटो)

निषेध सभेत विविध वक्त्यांकडून तीव्र निषेध
बागा समुद्र किनार्‍या लगतच्या डोंगराची दरड कोसळणे रोखण्यासाठी बांधलेली संरक्षक भिंत पाडलेल्या व्यक्तीने सदर संरक्षक भिंत पुन्हा न उभारल्याप्रकरणी काल २०० हून अधिक लोकांनी काल या ठिकाणी सभा घेऊन निषेध केला. यावेळी आमदार मायकल लोबो यांनी आपण हा विषय आजपासून सुरू होणार्‍या विधानसभा अधिवेशनात मांडणार असल्याचे जाहीर केले.सदर संरक्षक भींत सार्वजनिक बांधकाम खात्याने सव्वा कोटी रुपये खर्चून बांधली होती. किनार्‍यालगत असलेल्या डोंगरावरील झाडे, माती, दगड पावसाळ्यात कोसळत असल्याने तसेच वर असलेल्या प्राचीन ‘झेवियर चॅपेल’ची हानी टाळण्यासाठी ही भींत बांधण्यात आली होती. मात्र ती हडफडे नागवाचे पंच केल्फा फर्नांडिस यांनी पाडून तेथील आपल्या शॅकवर जाण्यासाठी रस्ता बांधकाम सुरू केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आमदार मायकल लोबो व ग्रामस्थांनी ते काम बंद पाडून संरक्षक भिंत पुन्हा उभारण्याचा इशारा संबंधितांना दिला होता. मात्र ती बांधण्याची चिन्हे नसल्याने काल सभा घेऊन निषेध करण्यात आला. तसेच सदर ठिकाणी रस्ता करू दिला जाणार नाही असा निर्धार व्यक्त केला.
आमदार मायकल लोबो यांनी आपल्या भाषणात याप्रकरणी हणजुण पोलिसांना लक्ष्य केले. मुख्यमंत्रीही गप्प आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच एक राजकीय नेता पोलिसांना पाठिंबा देत असून डोंगर कापणार्‍या कंत्राटदाराला अटक न करता त्याला सोडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. यामुळे आपण विधानसभेत हा प्रश्‍न मांडणार असे ते म्हणाले. या सभेत नवनिर्वाचित स्थानिक जि. पं. सदस्य शॉन मार्टिन्स, प्रजल साखरदांडे, हडफडे सरपंच सुष्मा नागवेकर, ऍड्. योगेश नाईक, फा. मिरांडा, फा. सावियो व अन्य वक्त्यांनी नाराजी व्यक्त केली.