बांदा
गोव्यातून कोल्हापूरला नेल्या जाणार्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा पोलिसांनी चेक नाक्यावर कारवाई केली. या कारवाईत ५ लाख ५२ हजार ६०० रुपयांच्या दारूसह एकूण १२ लाख ५२ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी चालक विशाल रघुनाथ पाटील (वय ३२) व क्लिनर शिवाजी गोविंद पाटील (वय ३१, दोघेही रा. करवीर, कोल्हापूर) यांना अटक करण्यात आली.
गोव्यातून कोल्हापूरच्या दिशेने गोवा बनावटीची दारू वाहतूक होणार असल्याची टीप बांदा साहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांना मिळाली होती. त्यानुसार चेकपोस्टवर सापळा रचण्यात आला होता. दुपारी १२.३० च्या सुमारास गोव्यातून येणारा टेम्पो तपासणीसाठी थांबविण्यात आला. यावेळी चालकाने जुने लोखंडी स्क्रॅप असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी हौद्याची कसून तपासणी केली असता आतमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचा बेकायदा दारूसाठा आढळून आला.
यात मॅकडॉवेल नं.१ रिझर्व्ह व्हिस्कीच्या ३३६ बाटल्या (किंमत ६० हजार ४८० रूपये), डिएसपी ब्लॅक व्हिस्कीच्या ४३२ बाटल्या (७१ हजार २८० रूपये), व्होडकाच्या १९२ बाटल्या (३१ हजार ६८० रूपये), डायरेक्टर स्पेशल व्हिस्कीच्या ४३२ बाटल्या (५८ हजार ३२० रूपये), रियल ७ व्हिस्कीच्या ६०० बाटल्या (१ लाख ६२ हजार रूपये), किंगफिशर बियरच्या २५२ बाटल्या (६८ हजार ४० रूपये) व टुबोर्ग प्रिमियम बियरच्या ४२० बाटल्या (१ लाख ८०० रूपये) असा एकूण ५ लाख ५२ हजार ६०० रूपयांचा दारूसाठा जप्त केला. ही कारवाई साहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी डी. आर. धुरी, एस. बी. कदम, एम .ए. पावसकर, पी. ए. कदम, एम. के. भोई, प्रमोद नाईक यांच्या पथकाने केली.