
>> मुश्फिकुर रहीम-सब्बीर रहमानची शतकी भागीदारी
मुश्फिकुर रहीम (नाबाद ६२) व सब्बीर रहमान (६६) यांना सहाव्या गड्यासाठी केलेल्या १०५ धावांच्या भागीदारीच्या जोरावर यजमान बांगलादेशने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ६ बाद २५३ अशी मजल मारली आहे. या भागीदारीमुळे नॅथन लायनने घेतलेल्या पाच बळींचा प्रभाव कमी झाला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर बांगलादेशची ५ बाद ११७ अशी स्थिती झाली होती. यानंतर रहीमने सब्बीरच्या साथीने डाव सावरताना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा नेटाने सामना केला. रहीमने एकेरी-दुहेरी धावांवर भर देताना धावफलक सतत हलता ठेवला तर सब्बीरने आक्रमक फटका खेळताना हात आखडता घेतला नाही. सब्बीरने आपल्या ६६ धावांच्या खेळीत ६ चौकार व १ षटकार लगावला. दिवसअखेर नासिर हुसेन (१९) नाबाद असून रहीमसह त्याने ३१ धावांची भागीदारी केली आहे. बांगलादेशचा संघ आज दुसर्या दिवशी तीनशे धावांचा टप्पा ओलांडण्याचा प्रयत्न करणार असून त्यांना रोखण्यासाठी कांगारूंच्या गोलंदाजांना आपली दिशा व टप्पा योग्य राखावा लागेल. ऑस्ट्रेलियाने या सामन्यासाठी जोश हेझलवूडच्या जागी स्टीव ओकिफ व उस्मान ख्वाजाच्या जागी हिल्टन कार्टराइटला संधी दिली. बांगलादेशने वेगवान गोलंदाज शफिउलला वगळून स्पेशलिस्ट फलंदाज मोमिनूल हकचा समावेश केला.
धावफलक
बांगलादेश पहिला डाव ः तमिम इक्बाल पायचीत गो. लायन ९, सौम्य सरकार पायचीत गो. लायन ३३, इमरूल काईस पायचीत गो. लायन ४, मोमिनूल हक पायचीत गो. लायन ३१, शाकिब अल हसन झे. वेड गो. एगार २४, मुश्फिकुर रहीम नाबाद ६२, सब्बीर रहमान यष्टिचीत वेड गो. लायन ६६, नासिर हुसेन नाबाद १९, अवांतर ५ एकूण ९० षटकांत ६ बाद २५३
गोलंदाजी ः पॅट कमिन्स १७-४-३३-०, नॅथन लायन २८-६-७७-५, स्टीव ओकिफ २०-०-७०-०, ऍश्टन एगार १७-६-४६-१, ग्लेन मॅक्सवेल ३-०-६-०, हिल्टन कार्टराइट ५-१-१६-०
तब्बल ७९ वर्षांनंतर
चितगाव कसोटीत नॅथन लायन या फिरकीपटूने नव्या चेंडूने गोलंदाजी केली. यापूर्वी लेगब्रेक गुगली गोलंदाज बिल ओरेली यांनी १० ते १४ जून १९३८ या कालावधीत इंग्लंडविरुद्ध नॉटिंघम येथे झालेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावातील दुसरे षटक टाकले होते. याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाने तब्बल ११ वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये तीन स्पेशलिस्ट फिरकीपटू उतरवले. २००६ साली अखेरच्या वेळी बांगलादेशविरुद्ध शेन वॉर्न, स्टुअर्ट मॅकगिल व डॅन कल्लन हे तज्ज्ञ फिरकीपटू चितगाव कसोटीत खेळले होते.
लायनचा सिंहाचा वाटा
कसोटी क्रिकेटमध्ये आघाडीच्या चारही फलंदाजांना पायचीत करणारा नॅथन लायन हा जगातील पहिला खेळाडू बनला. यापूर्वी २०११ साली भारताच्या हरभजन सिंगने द. आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटीत यजमानांच्या पहिल्या तीन फलंदाजांना पायचीत केले होते. लायनने काल बांगलादेशचे सहा पैकी पाच गडी बाद केले. सलग तिसर्या कसोटीत पाच बळी घेण्याच्या कामगिरी त्याने केली. भारताविरुद्धच्या धरमशाला कसोटीतील पाच बळींनंतर त्याने मिरपूर कसोटीमधील दोन्ही डावांत पाच बळी घेत प्रमुख गोलंदाजाची जबाबदारी सांभाळली होती.