बांगलादेशने उपांत्य फेरीत काल गुरुवारी न्यूझीलंडचा सहा गडी राखून पराभव करत १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत बांगलादेशचा सामना आता टीम इंडियासोबत होणार आहे.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत ८ बाद २११ धावा अशी आश्वासक मजल मारली. न्यूझीलंडकडून बेकहॅम व्हीलर -ग्रीनलने सर्वाधिक ७५ धावांची नाबाद खेळी केली. ५ चौकार व २ षटकारांसह त्याने आपली खेळी सजवली. निकोलस लिडस्टोनने ४४ तर फर्ग्युस लॅलमॅनने २४ धावांची खेळी केली. बांगलादेशकडून डावखुरा जलदगती गोलंदाज शोरिफुल इस्लाम सर्वांत यशस्वी ठरला. त्याने ४५ धावांत ३ गडी बाद केले. शमीम हुसेन व हसन मुरादने प्रत्येकी दोन तर डावखुरा संथगती गोलंदाज रकीबुल हसनने एक गडी बाद केला. न्यूझीलंडने दिलेले २१२ धावांचे आव्हान बांगलादेशने दमदार फलंदाजीच्या जोरावर सहज पार केले.
बांगलादेशचे पहिले दोन गडी झटपट बाद झाले. मात्र, त्यानंतर महमुदुल हसन जॉय आणि तौहीद हृदॉयने डाव सांभाळला. या दोघांनी तिसर्या गड्यासाठी ६८ धावांची भागीदारी केली. ह्रदॉय वैयक्तिक ४० धावांवर बाद झाल्यानंतर जॉयने शहादत हुसेनला सोबत घेत चौथ्या गड्यासाठी १०१ धावा जोडत संघाला विजयाच्या दारात नेेले. महमुदुल हसन जॉयने १२७ चेंडूंत १३ चौकारांसह १०० धावांची शतकी खेळी साकारली. शहादत हुसेनने ५१ चेंडूत ४० धावा करून नाबाद राहिला. कर्णधार अकबर अलीने ५ धावांवर नाबाद राहत संघाच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली.