बांगलादेशची झिंबाब्वेवर मात

0
117

>> नवोदित अफिफ हुसेनची आक्रमक फलंदाजी

मोसद्देक हुसेनची अष्टपैलू कामगिरी व अफिफ हुसेनच्या फटकेबाजीच्या जोरावर बांगलादेशने काल तिरंगी टी-ट्वेंटी मालिकेत विजयी सलामी देताना झिंबाब्वेचा ३ गडी व २ चेंडू राखून पराभव केला. पावसामुळे १८ षटकांच्या खेळविण्यात आलेल्या या सामन्यात झिंबाब्वेने ५ बाद १४४ धावा केल्या. बांगलादेशने विजयी लक्ष्य १७.४ षटकांत गाठले. ६० धावांत ६ गडी बाद झाल्यानंतर मोसद्देक व अफिफ यांच्यातील भागीदारी यजमानांना विजयी करून देण्यास पुरेशी ठरली. बांगलादेशकडून ताईजुल इस्लाम व झिंबाब्वेकडून टोनी मुनयोंगा यांनी काल टी-ट्वेंटी पदार्पण केले.

नाणेफेकीचा कौल जिंकून बांगलादेशने प्रथम गोलंदाजी निवडली. ब्रेंडन टेलर लवकर बाद झाल्यानंतर एर्विन व मासाकद्झा यांनी दुसर्‍या गड्यासाठी ४४ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी फुटल्यानंतर झिंबाब्वेची ५ बाद ६३ असी घसरगुंडी उडाली. रायन बर्ल याने यानंतर आपले पहिले टी-ट्वेंटी अर्धशतक लगावताना ३२ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ५७ धावा कुटताना मुतोंबोद्झी (२७) याच्यासह ८१ धावांची अविभक्त भागीदारी करून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.
झिंबाब्वेप्रमाणेच बांगलादेशच्या संघालादेखील चांगली सुुरुवात लाभली नाही. ठराविक अंतराने गडी बाद होत राहिल्याने त्यांचा संघ ६ बाद ६० असा अडचणीत सापडला होता.

आपला केवळ दुसराच आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामना खेळणार्‍या अफिफ याने झिंबाब्वे गोलंदाजांच्या चिंधड्या उटवताना सुरेख मैदानी फटके खेळले. अर्धशतकानंतर बाद होण्यापूर्वी त्याने मोसद्देक (नाबाद ३०) याच्यासह सातव्या गड्यासाठी ८२ धावांची भागीदारी केली.

धावफलक
झिंबाब्वे ः ब्रेंडन टेलर झे. महमुदुल्ला गो. ताईजुल ६, हॅमिल्टन मासाकाद्झा झे. सब्बीर गो. सैफुद्दिन ३४, क्रेग एर्विन झे. मोसद्देक गो. मुस्तफिझुर ११, शॉन विल्यम्स झे. व गो. मोसद्देक २, टिमसेन मरुमा धावबाद १, रायन बर्ल नाबाद ५७ (३२ चेंडू, ५ चौकार, ४ षटकार), टिनाटेंडा मुतोंबोद्झी नाबाद २७, अवांतर ६, एकूण १८ षटकांत ५ बाद १४४
गोलंदाजी ः शाकिब अल हसन ४-०-४९-०, ताईजुल इस्लाम ३-०-२६-१, मोहम्मद सैफुद्दिन ४-०-२६-१, मुस्तफिझुर रहमान ४-०-३१-१, मोसद्देक हुसेन ३-०-१०-१
बांगलादेश ः लिटन दास त्रि. गो. चतारा १९, सौम्य सरकार झे. माद्झिवा गो. जार्विस ४, शाकिब अल हसन झे. मासकाद्झा गो. चतारा १, मुश्फिकुर रहीम झे. टेलर गो. जार्विस ०, महमुदुल्ला रियाद पायचीत गो. बर्ल १४, सब्बीर रहमान झे. बर्ल गो. माद्झिवा १५, मोसद्देक हुसेन नाबाद ३०, अफिफ हुसेन झे. मासाकाद्झा गो. माद्झिवा ५२ (२६ चेंडू, ८ चौकार, १ षटकार), मोहम्मद सैफुद्दिन नाबाद ६, अवांतर ७, एकूण १७.४ षटकांत ७ बाद १४८
गोलंदाजी ः शॉन विल्यम्स ३-०-३१-०, काईल जार्विस ४-०-३१-२, तेंदाय चतारा ३.३-०-२५-२, रायन बर्ल ३-०-२७-१, नेव्हिल माद्झिवा ३.४-०-२५-२