
>> मोमिनूल हक नाबाद १७५
मोमिनूल हकच्या (नाबाद १७५ धावा) व मुश्फिकुर रहीम (९२) यांनी तिसर्या गड्यासाठी केलेल्या २३६ धावांच्या भागीदारीच्या बळावर बांगलादेशने श्रीलंकेविरुद्ध कालपासून सुरू झालेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ४ बाद ३७४ धावांचा डोंगर उभारला आहे.
बळी मिळविण्यासाठी संघर्ष केल्यानंतर लंकेने दुसर्या नव्या चेंडूने रहीम व दास (०) यांना माघारी पाठविले. दिवसअखेर कर्णधार महमुदुल्ला ९ धावा करून मोमिनूलला साथ देत होता. दिलरुवान परेरा व रंगना हेराथ या लंकेच्या प्रमुख फिरकी गोलंदाजांना प्रभाव पाडता आला नाही. दोघांनी मिळून ४४ षटके टाकताना १९८ धावा मोजून केवळ १ बळी घेतला. मनगटी फिरकीपटू लक्षन संदाकनला खेळपट्टीकडून भरपूर मदत मिळाली. परंतु, दिशा व टप्पा योग्य न राखल्याने त्याला केवळ एक गडी बाद करता आला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर तमिम इक्बाल (५२) व ईमरूल कायस (४०) यांनी बांगलादेशला ७२ धावांची सलामी दिली. परेराच्या ‘आर्म बॉल’वर तमिमचा त्रिफळा उडाला. तिसर्या क्रमांकावर आलेल्या मोमिनूलने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा अवलंबताना लंकेच्या गोलंदाजांना वर्चस्व गाजविण्याची संधी दिली. जेवणाची वेळ जवळ येत असताना कायस दुसर्या गड्याच्या रुपात बाद झाला. दुसर्या गड्याच्या पतनानंतरही मोमिनूलने आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला. त्यामुळे बांगलादेशचा धावफलक सतत हलता राहिला. दुसर्या टोकाने रहीमने नांगर टाकत अधिक धोका पत्करला नाही. शतकाला ८ धावांची आवश्यकता असताना लकमल याने यष्टिरक्षक डिकवेलाकरवी त्याला बाद केले. यष्टिरक्षक फलंदाज लिट्टन दास याची पहिल्याच चेंडूवर यष्टी वाकवून लकमलने लंकेला दिलासा दिला.
धावफलक
बांगलादेश ः तमिम इक्बाल त्रि. गो. परेरा ५२, ईमरूल कायस पायचीत गो. संदाकन ४०, मोमिनूल हक नाबाद १७५, मुश्फिकुर रहीम झे. डिकवेला गो. लकमल ९२, लिट्टन दास त्रि. गो. लकमल ०, महमुदुल्ला नाबाद ९, अवांतर ६, एकूण ९० षटकांत ४ बाद ३७४
गोलंदाजी ः सुरंगा लकमल १७-३-४३-२, लाहिरु कुमारा १२-१-६४-०, दिलरुवान परेरा २४-४-९८-१, रंगना हेराथ २०-१-१००-०, लक्षन संदाकन १३-१-५८-१, धनंजय डीसिल्वा ४-०-११-०