बांगलादेशचा टीम इंडियाला धक्का

0
230

>> धवन-राहुलची संथगती फलंदाजी नडली

>> खलील अहमदचा स्वैर मारा

बांगलादेशने पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाचा ७ गडी व ३ चेंडू राखून पराभव केला. भारताचा डाव १४८ धावांपर्यंत मर्यादित ठेवल्यानंतर बांगलादेशने रहीमच्या समयोचित अर्धशतकावर आरुढ होत विजयाची चव चाखली. आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटीमध्ये बांगलादेशने नवव्या प्रयत्नात टीम इंडियावर मिळविलेला हा पहिलाच विजय ठरला. आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटीमधील हा १००० वा सामना होता.

बांगलादेशचा कर्णधार महमुदुल्ला याने या लढतीत नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. कर्णधार रोहित शर्माला केवळ ९ धावांवर माघारी धाडत बांगलादेशने चांगली सुरुवात केली. लोकेश राहुल (१७ चेंडूंत १५) व शिखर धवन यांनी यानंतर कूर्मगती फलंदाजी करत पॉवरप्लेचा लाभ उठवला नाही. पॉवरप्ले संपल्यानंतर राहुल परतला. धवनने आपले घरचे मैदान असूनही आक्रमकतेला मुरड घालत संथ खेळी केली. ४२ चेंडूंत ४१ धावा करून त्याने तंबूची वाट धरली. श्रेयस अय्यरने १३ चेंडूंत २२ धावा जमवून चांगली सुरुवात केली होती. परंतु, त्याची खेळी यापलीकडे गेली नाही. ऋषभ पंत यालादेखील धावा करण्यासाठी झगडावे लागले. कृणाल पंड्या (८ चेंडूंत नाबाद १५) व सुंदर (५ चेंडूंत नाबाद १४) यांनी अखेरच्या काही षटकांत आक्रमकता दाखवल्याने धावसंख्या १४८ पर्यंत गेली.

लक्ष्य विशाल नसल्याचे हेरून बांगलादेशी फलंदाजांनी मोजून मापून खेळ केला. अधिक धोके न पत्करल्याने भारताला गडी बाद करण्याच्या फारशा संधी मिळाल्या नाहीत. तर काही मोजक्या संधींचा लाभ उठवण्यात भारतीय संघ कमी पडला. अठराव्या षटकात कृणालने चहलच्या गोलंदाजीवर रहीमला जीवदान दिले. याच रहीमने डावातील १९व्या षटकात खलीलला सलग चार चौकार ठोकत बांगलादेशला विजयाच्या दारात नेेले. त्यामुळे शेवटचे षटक टाकणार्‍याकडे धावांचे पुरेसे पाठबळ मिळाले नाही. मालिकेतील दुसरा सामना ७ रोजी राजकोट येथे खेळविला जाणार आहे.

धावफलक
भारत ः रोहित शर्मा पायचीत गो. शफिउल ९, शिखर धवन धावबाद ४१, लोकेश राहुल झे. महमुदुल्ला गो. अमिनूल १५, श्रेयस अय्यर झे. नईम गो. अमिनूल २२, ऋषभ पंत झे. नईम गो. शफिउल २७, शिवम दुबे झे. व गो. अफिफ १, कृणाल पंड्या नाबाद १५, वॉशिंग्टन सुंदर नाबाद १४, अवांतर ४, एकूण २० षटकांत ६ बाद १४८
गोलंदाजी ः शफिउल इस्लाम ४-०-३६-२, अल अमिन हुसेन ४-०-२७-०, मुस्तफिझुर रहमान २-०-१५-०, अमिनूल इस्लाम ३-०-२२-२, सौम्य सरकार २-०-१६-०, अफिफ हुसेन ३-०-११-१, मोसद्देक हुसेन १-०-८-०, महमुदुल्ला १-०-१०-०
बांगलादेश ः लिटन दास झे. राहुल गो. चहर ७, मोहम्मद नईम झे. धवन गो. चहल २६, सौम्य सरकार त्रि. गो. खलील ३९, मुश्फिकुर रहीम नाबाद ६० (४३ चेंडू, ८ चौकार, १ षटकार), महमुदुल्ला नाबाद १५, अवांतर ७, एकूण १९.३ षटकांत ३ बाद १५४
गोलंदाजी ः दीपक चहर ३-०-२४-१, वॉशिंग्टन सुंदर ४-०-२५-०, खलील अहमद ४-०-३७-१, युजवेंद्र चहल ४-०-२४-१, कृणाल पंड्या ४-०-३२-०, शिवम दुबे ०.३-०-९-०