>> इेतिहासिक विजय, प्रथमच पराभूत
रुमाना अहमदची अष्टपैलू कामगिरी आणि फरगना हकचे नाबाद अर्धशतक याच्या बळावर बांगलादेशने महिला टी-२० आशिया चषक स्पर्धेत भारतीय महिलांना चकित करताना त्यांची विजयी घोडदौडही खंडित केली. भारतीय महिलांचा आशिया चषक स्पर्धेतील आतापर्यंतच्या इतिहासातील हा पहिलाच पराभव ठरला. भारताने यंदाच्या स्पर्धेत दिमाखात सुरुवात करताना थायलंड व मलेशियन महिलांवर विजय मिळवित अपारजित वाटचाल केली होती. परंतु बांगलादेशने त्याला लगाम लावला. अष्टपैलू कामगिरी केलेल्या रुमाना अहमदमची सामनावीर पुरस्कारासाठी निवड झाली.
भारतीय महिलांकडून मिळालेल्या १४२ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशी महिलांनी ७ गड्यांच्या मोबदल्यात २०व्या षट्काच्या चौथ्या चेंडूवर विजय साकारला. लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. आयेशा रहमान ही १२ धावा जोडून तंबूत परतली. परंतु त्यानंतर फरगना हक संघाचा डाव सावरतानाच एक बाजू सांभाळून ठेवत ५ चौकार आणि १ षटकाराच्या सहय्याने ४६ चेंडूत नाबाद ५२ धावांची अर्धशतकी खेळी करीत ऐतिहासिक विजयात मोलाचा वाटा उचलला. सलामीवीर शमिमा सुलतानाने ३३ धावा जोडल्या. तर निगार सुलताना १ धाव काढून बाद झाली. त्यानंतर फरगनाने रुमाना अहमदच्या साथीने किल्ला लढवला. आणि शेवटच्या षटकात २ चेंडू राखून सामना जिंकवला. रुमानाने ३४ चेंडूत नाबाद ४२ धावांची खेळी करीत विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत ७ गडी गमावत १४१ अशी धावसंख्या उभारली होती. कर्णधार मिताली राज (१५), सलामीवीर स्मृती मानधना (२) आणि पूजा वस्त्राकार (२०) या तिघी झटपट बाद झाल्या. मात्र हरमनप्रीत कौरने ४२ धावा केल्या. तिला दीप्ती शर्माने चांगली साथ दिली. दिप्तीने २८ चेंडूत ५ चौकारांसह ३२ धावा केल्या. तर हरमनप्रीतने ३७ चेंडूत ६ चौकारांसह ४२ धावा केल्या. या दोघींच्या खेळीमुळे भारताला २० षटकात ७ बाद १४१ धावा केल्या. आता भारतीय महिलांचा पुढील सामना आज गुरुवार दि. ७ जून रोजी श्रीलंकन महिलांशी होणार आहे.