- – ऍड. प्रा. अशोक कृ. मोये
गोमंतभूमीत सर्वत्र आढळणारे माड हे कल्पवृक्ष आहेत. आपण त्यांची भोवतालच्या शहरीकरणाच्या रेट्यामध्ये जपणूक केली पाहिजे. ह्या कल्पवृक्षाच्या प्रत्येक अवयवाचा काही ना काही उपयोग होतोच होतो.
आपली गोमन्तभूमी समुद्रकिनारपट्टीत वसलेली असल्यामुळे प्राचीन काळापासून ती मोठमोठ्या नारळीच्या बागा व त्यांच्या रम्य अशा सौंदर्यासाठी ह्या विश्वाच्या नकाशावर एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून नावलौकीकास आलेली आहे. कुठल्याही उंच अशा ठिकाणावर राहून ताठ मानेने डुलणार्या कल्पवृक्षाकडे पाहताना तेथे दिसणारे सौंदर्य रमणीय असते.
आपल्या गोवा सरकारच्या पर्यटन खात्यानेसुद्धा नारळाच्या ह्या रम्य बागांची छायाचित्रे असलेली भेटकार्डे काढलेली आढळतात व ते त्यांचे कार्य एकदमच उचित असे आहे, कारण आम्ही या कल्पवृक्षाचा एकप्रकारे मानसन्मान करायलाच हवा, कारण ते एक बहुगुणी झाड आहे, असे माझे वैयक्तिक असेच मत आहे व बहुतेकजण ह्या मताशी नक्कीच सहमत असतील.
माडाला कोणी नारळीचे झाड, माड, कल्पवृक्ष असे संबोधतात. कल्पवृक्ष म्हणून संबोधण्याचे मुख्य कारण म्हणजे ते एक बहुपयोगी असेच एक झाड आहे.
ह्या वृक्षाच्या फळाला नारळ, अमृतफळ, श्रीफळ असेही संबोधले जाते, कारण ते फळ अमर असेच असते. ते कित्येक वर्षे त्याच आकारात राहिलेले आढळते. दीड -दोन वर्षांनंतर त्याच्या आतील गर खराब होऊन जातो. कालांतराने त्याची काळी पूड होऊन जाते, फळ एकदम हलके होऊन जाते, पण त्याचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षानुवर्षे त्याचा आकार तसाच राहतो.
कल्पवृक्षाचे वासे व पाट्या बनवू शकतो. त्यांचा घरे बनविण्यास उपयोग करतात व ते कित्येक वर्षे टिकतात. त्याच्याच आधारावर बांबूचे तीर घालून वर कौले घालतात व घराचे छप्पर बनवतात. माडाच्या झावळ्यांपासून झोपड्या, गोठे इत्यादी बनवू शकतो व त्यात आपण निवासित म्हणून राहू शकतो, कारण त्यांच्यापासून बनविलेले छप्पर ताप, वृष्टी, हिम यापासून माणसाचे रक्षण करण्यास सक्षम असतात व एकटेच नव्हे तर त्या निर्वासितांना नक्कीच आरोग्याचे वरदान प्राप्त झालेेले असते, तसेच संरक्षणही मिळते.
नारळसुद्धा एक बहुउपयोगी असेच फळ आहे. नारळाचे पीक वर्षभर मिळत असते व त्यामुळेच बागायतदारांना धनप्राप्ती होत असते. ह्या श्रीफळाची ‘गणराज’ म्हणून कल्पना करून आपण त्याचे पूजन करतो. देवास व ब्राह्मणास तो भेट म्हणून देत असतो. कच्च्या शहाळ्याचे रुचकर व स्वादिष्ट थंडगार जल मिळते, जे तहान त्वरित शमवते व ते प्याल्यावर एक प्रकारे शरीराला तरतरीपणा येतो व म्हणूनच ह्या झाडावर चढून नारळ काढणारे मध्ये थांबूनच ह्या जलाचे प्राशन करतात. त्यातील गर एकदमच स्वादिष्ट असतो व आपण कच्चा खाऊ शकतो, तसेच त्याचा स्वयंपाक, मिठाई, पंचखाद्य करण्यासाठी वापर करतात. नारळाचे तेल आपल्या आहाराचा एक मुख्य घटक असतो. ते अंगाला पण लावतात व ते केसात वापरल्याने शरीराला एक प्रकारे आरामच मिळतो. आपणाला माहीत असेलच की जगातील एका बलाढ्य देशाने म्हणजेच अमेरिकेतील वैज्ञानिकांनी हे तेल आरोग्याला आपायकारक आहे असे जगाला चुकीचे भासवून आपल्या पामोलीन तेलाला जागतिक बाजारपेठ मिळवून दिली. पण आता काही वर्षांनंतर ती त्यांनी मुद्दामहून केलेली चूक लक्षात आल्याने आता डॉक्टरसुद्धा हे तेल वापरण्यास लावतात व एवढेच नव्हे तर चाटण करून ते पोटात घ्यायला लावतात, कारण त्याला औषधी गुणधर्म असतो हे आता सिद्ध झालेले आहे. ह्या तेलाचे दीप पण लावतात व पुरातन काळात ह्याच दीपांच्या उजेडात रात्रीचे आपण काम करत होतो.
नारळाचे (फळाचे) तेल काढल्यानंतर ‘पेंड’ तयार होते व ती पेंढ जनावरांना एकदम पौष्टीक असल्याने त्याचा वापर केला जातो. काथ्यापासून सुंब, रज्जू, दावी, दोरखंड बनवतात. ते एकदमच घट्ट असतात व त्यांचा पण उपयोग असतो. त्याच्या करवंटीपासून माणूस कौशल्य वापरून कित्येक वस्तू, चमचे, खेळणी, डावले बनवतात. कातडी (सोडण) ज्वलनासाठी इतकेच नव्हे तर चितेला अग्नी देण्यासही त्याचा उपयोग करतात. त्याच्या हिरांपासून केरसुण्या बनवतात. मादक दारु पण ह्या झाडाला छेदून बनवतात. असेच हे बहुपयोगी झाड आहे. आर्थिकदृष्ट्या पाहिल्यास या झाडापासून विपुल धन प्राप्ती होत असते, अनेकांना रोजगार मिळतो व तो रोजगार कष्ट करून किंवा एका जागेवर बसूनसुद्धा शांत नामजप करूनसुद्धा प्राप्त होऊ शकतो व म्हणूनच प्राचीन काळापासूनच ह्या झाडांची लागवड करतात. हे झाड नक्कीच माणसाला एक प्रकारे सौख्यप्राप्ती करून देते व त्यामुळे आमच्या गोव्यातील कित्येक जमीनदार या शेतकी व्यवसायात गुंतलेले आढळतात.
वास्तविक तसे पाहिले तर याच झाडावर एक सुंदर असे पुस्तक तयार होऊ शकते व ते पुस्तक लोकांना नक्कीच आवडेल व असे पुस्तक प्रकाशित झालेले असेलही. आपण ह्या कल्पवृक्षाचे नक्कीच लाड करायला हवेत व त्याला मानाचे स्थान दिले पाहिजे!