– माधव बोरकर
जुवारी नदीच्या काठी वसलेला मडकई हा गाव निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेला; पण त्याचबरोबर या गावाने गोव्याला आणि पर्यायाने देशाला कलावंत, लेखक दिले. विष्णू जयवंत बोरकर, दलित साहित्याचे फ्रेंच भाषेचे अनुवादक डॉ. आनंद काशिनाथ कामत, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार रामचंद्र पांडुरंग कामत, जे. जे. स्कूल ऑफ अप्लायड आर्टचे निवृत्त डीन किसन कामत व प्रसिद्ध गायक नट श्रीपादराव नेवरेकर मडकईचे सुपुत्र. या नामावलीत अलिकडे दिवंगत झालेले रघुवीर नेवरेकर यांचे नाव घ्यावे लागेल. ते व्यावसायिक रंगभूमीवर चमकले नसले तरी त्यांनी केलेल्या मोजक्या भूमिका गाजल्या.नेवरेकरांचा जन्म मडकई येथे १९२८ साली झाला. त्यांचे वडिल राम उर्फ कुटुबाब हे उत्सवी रंगभूमीवर काम करायचे. अर्थात मडकईच्या नवदुर्गा देवस्थानाच्या उत्सवात होणार्या नाटकात त्यांनी भूमिका केल्या. त्यांच्याकडे विलक्षण विनोदबुद्धी होती व हा वारसा त्यांच्या मुलांनी जपला. १९३० नंतर आर्थिक व शैक्षणिक कारणामुळे अनेक सारस्वत कुटुंबांनी मुंबईसारख्या शहरामध्ये स्थलांतर केले. नेवरेकर कुटुंब मुंबईस स्थलांतरीत झाले. रघुवीरबाबांचे वडिलबंधू अनंतदाद हे सर्वप्रथम मुंबईस आले व त्यांनी बेस्टमध्ये नोकरी धरली. कालांतराने आईवडिल व इतर भावंडे मुंबईस आली व कांदेवाडी – गिरगाव येथे त्यांनी बिर्हाड केले. बाळकृष्ण, रघुवीर, दुर्गा, मीरा व शिवराज ही भावंडे गिरगावातील शाळेत शिकायला लागली. मडकई ते मुंबई हा प्रवास रघुवीरबाबांच्या जीवनांत क्रांतीकारक ठरला. बाराव्या वर्षापासून व्यावसायिक रंगभूमीशी त्यांचा परिचय झाला. बालगंधर्व, नानासाहेब फाटक हे त्यांचे खर्या अर्थाने आदर्श होते. नानासाहेबांचा अभिनय व व्यक्तिमत्व हा त्यांच्या कौतुकाचा विषय असायचा. आणि अभ्यासाचाही. मुंबईसारख्या महानगरीत आल्यामुळे त्यांना अभिनयाच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या.
नेवरेकरांनी मुंबई आकाशवाणीवर १९४४ पासून मुलांच्या कार्यक्रमातून भाग घेण्यास सुरूवात केली. ज्ञानेश्वर नाडकर्णीबरोबर त्यांना आनंदराव ढोलेकर यांचे मार्गदर्शन लाभले. आकाशवाणीशी त्यांचे नाते शेवटपर्यंत टिकले. चाळीसाव्या दशकात विल्सन हे मुंबईतील महत्त्वाचे कॉलेज होते. मॅट्रिकनंतर त्यांनी विल्सनमध्ये प्रवेश घेतला त्याचे मुख्य कारण म्हणजे नाटक होय. या कॉलेजमधून अनेक नाट्य कलावंत मराठी रंगभूमीवर उदयास आले, त्यात प्रामुख्याने विजया मेहता, आशा भेंडे यांचा समावेश होतो. पूर्वाश्रमीच्या आशा इझेकेल बरोबर अनेक एकांकिकांतून त्यांनी भूमिका केल्या. विल्सन कॉलेज हे आपल्यासाठी एक प्रयोगशाळा होती असे ते मानायचे. बौद्धिक विकासाबरोबरच आपले व्यक्तिमत्व आकारास आले याबद्दल या कॉलेजविषयी त्यांच्या मनात आदरभाव होता. त्यांची नाटकाची आवड इथे जोपासली गेली.
रसायनशास्त्रातली पदवी घेतल्यानंतर व्यावसायिक नट व्हावे असा विचार रघुवीरबाबा करू शकले नाही. कारण या व्यवसायातला अस्थिरपणा त्यांना परवडणारा नव्हता. कौटुंबिक जबाबदार्यांमुळे नोकरी करणे त्यांना क्रमप्राप्त होते. त्यामुळे ‘किलिक्स निक्सन’ या रंगाचे उत्पादन करणार्या कंपनीत त्यांनी नोकरी धरली व आपल्या कर्तबगारीच्या जोरावर ते मार्केटिंग मॅनेजराच्या पदापर्यंत पोहोचले. पुढे ही नोकरी सोडून त्यांनी भागिदारीत स्वतंत्र उद्योग सुरू केला. पण नाटकाशी असलेले त्यांचे नाते त्यांनी तोडले नाही. त्यांचे सख्ये आतेभाऊ नटवर्य गोपिनाथ सावकार यांचे त्यांना सतत मार्गदर्शन लाभले.
दी गोवा हिंदू असोसिएशनचा कला विभाग दर्जेदार नाट्यनिर्मिती करित होता. त्यांच्या ‘संशयकल्लोळ’ नाटकात त्यांनी केलेली फाल्गुनरावाची भूमिका विशेष लक्षात रहाणारी ठरली. गोपिनाथ सावकारांच्या दिग्दर्शनाखाली सुमंत केळेकर, आशालता वाबगावकर व रघुवीर नेवरेकर या नाट्यसंचाने रंगभूमीवर आणलेले नाटक त्या वर्षीच्या महाराष्ट्र नाट्यस्पर्धेत भाव खाऊन गेले व असोसिएशनला प्रतिष्ठा लाभली. रघुवीरबाबांचा कल हा आधुनिक नाटकापेक्षा जुन्या नाटकांकडे जास्त होता. ‘शारदा’, ‘मानापमान’, ‘एकच प्याला’ ही नाटके त्यांना विशेष आवडत असत. नोकरीनिमित्त अहमदाबाद येथे वास्तव्य असताना त्यांचा गुजराती रंगभूमीशी परिचय झाला.
नोकरीमुळे मनात असूनही व्यावसायिक नाटके ते करू शकले नसले तरी सुरूवातीस आकाशवाणी व नंतर दूरदर्शन ही माध्यमे त्यांनी जवळ केली. आकाशवाणीशी त्यांचे नाते दीर्घ काळाचे. श्रुतिका लिहिणे व त्यात भूमिका करणे हा त्यांचा हातखंडा होता. आकाशवाणी सारख्या श्राव्य माध्यमाची बलस्थाने व मर्यादा ओळखणारा कलावंत अपवादाने मी माझ्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत पाहिलेला आहे. गोवा मुक्तीपूर्व काळात आकाशवाणी मुंबई केंद्रावरील श्रुतिका मालिका लिहीत असत. पोर्तुगीज सरकारवर टीका हा मालिकेचा विषय. या मालिकेला मुंबई आणि गोव्यात प्रचंड लोकप्रियता लाभली होती. शाणूदाद हा स्टॉक कॅरेक्टर ते स्वत: करायचे. अलिकडच्या काळात ‘शीतकडी’ या मालिकेचे लेखन त्यांनी केले. मंगला रानडे (गायिका देवकी पंडित यांची आजी), ललिता खांडेपारकर, मधुकर हेदे व किसन कामत हा कलाकारांचा संच डोळ्यासमोर ठेवून ते लेखन करीत असत. या मालिकेच्या लेखनास तात्कालिक परिस्थितीचा संदर्भ असला तरी उत्तम लेखनशैलीमुळे ते निरस वाटत नसे.
रघुवीरबाबांच्या मृत्युची बातमी कळल्याबरोबर माझ्या मनात त्यांच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. १९८४ मध्ये ते आजारपणातून उठले होते आणि राम गणेश गडकरींच्या जन्मशताब्दीचे निमित्त साधून मी ‘एकच प्याला’ची कोकणी रेडिओ आवृत्ती केली होती. त्यावेळी त्यांचा माझा परिचय झाला. रघुवीरबाब सुधाकर व आशालता सिंधू असा तो कास्ट होता. यावेळी या कलावंताला श्राव्य माध्यमाची किती सुक्ष्म जाण आहे याची मला प्रचीती आली आणि बरेच काही शिकायला मिळाले. आवाजातले चढ-उतार, फेक व माइकशी किती अंतर ठेवावे याचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. ‘एकच प्याला’च्या प्रसारणानंतर आमचे सहकारी पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी आमच्या रोजच्या कार्यक्रमात बैठकीत तोंड भरून स्तुती केली. आणि माझ्या सारख्या या क्षेत्रातल्या नवख्या माणसाला हुरूप आला. आम्ही दर दिवाळीच्या निमित्ताने एक खास नाट्य निर्मिती करीत असू. एका वर्षी आम्ही यशवंत रामाणी यांनी केलेला ‘शाकुंतल’ नाटकाचा अनुवाद प्रसारित केला. या अनुवादाला नाट्याची लय नव्हती. नेवरेकरांनी हा अनुवाद पुन्हा लिहून काढला, त्यांचे समाधान होईपर्यंत. पुन्हा संकलन त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्हायचे. या बाबतीत पैसा व वेळ यांचा विचार ते कधीच करीत नसत. परिपूर्णतेचा ध्यास असलेला हा कलावंत होता.
कोकणी नाटकाला एका वेगळ्या अर्थाने त्यांचे योगदान आहे. ‘पोपेबाबाली मुंबय’, ‘जन्मगाठ’, ‘कडूलिंबू’ ह्या तीन नाटिका कोकणी रंगभूमीवर गाजल्या. ज्याकाळी कोकणी साहित्यात नानाकाराचा पाढा होता तेव्हा या नाटिका महत्त्वाच्या ठरल्या. ‘पोपेबाबाली मुंबय’ ही एक विनोदी नाटिका. पोपेबाब मुंबईला जातात व परत आपल्या गावी आल्यावर आपले अनुभव मित्राला सांगतात. मराठी भाषेच्या अज्ञानातून झालेले विनोद फार चटकदार वाटतात. मुंबईतली गर्दी, डास, ढेकूण याने त्रस्त झालेला पोपेबाब आपल्या जिवाची मुंबई करून गावी परतल्यावर सुटकेचा सुस्कारा सोडतो. आज मुंबई शहर आपल्याला अतिपरिचयाचे झाल्यामुळे ही नाटिका कालबाह्य वाटते. परंतु त्यांच्या लेखनात आढळणारा कोकणी भाषेचा लहेजा कोकणीच्या अभ्यासकाला वेगळी दृष्टी देऊन जातो. ‘जन्मगाठ’ ही नाटिका कोकणी रंगभूमीवर लोकप्रिय झाली. त्याचप्रमाणे मुंबई दूरदर्शनवर ती सादर केली गेली. या नाटिकेत आशालताची प्रमुख भूमिका होती. गमतीची गोष्ट म्हणजे या भूमिकेमुळे आशालता हिंदी सिनेमात पोहोचली. बासू चटर्जी ‘अपने पराये’ या सिनेमासाठी योग्य कलावंताच्या शोधात होते. योगायोगाने त्यांनी ‘जन्मगाठ’ बघितली आणि त्यांचा शोध संपला. यासाठी हिंदी सिनेमाने कोकणी व रघुवीरबाबांच्या ऋणात राहिले पाहिजे. त्यांनी केलेले ‘शारदा’ नाटकाचे दूरदर्शन रूपांतर असेच वेधक होते.
नेवरेकरांची प्रतिमा लोकांच्या मनात ठसली ती १९८४ साली प्रदर्शित झालेल्या ‘श्वेतांबरा’ या दूरदर्शन मालिकेमुळे. त्या काळात आजच्या सारखे मालिकांचे पीक आले नव्हते. या मालिका तेरा भागांच्या त्यामुळे आटोपशिर असायच्या. या मालिकेतील त्यांची खलनायकाची भूमिका खूप लोकप्रिय झाली. एकदा त्यांनी मला दाखवलेल्या एका पत्राचा आशय आठवतो. सत्तरीत असलेल्या अमराठी बाईंचे ते पत्र होते. ती बाई घरात एकटी असताना ही खलनायकाची भूमिका बघून घाबरून जायची. डोळ्यातील भाव व आवाजाची फेक या दोन गुणांमुळे त्यांची भूमिका जिवंत व्हायची.
नेवरेकर कुटुंबाने मुंबईत राहून आपले गोंयकारपण जपले. हे अख्खे कुुटुंब हा स्वतंत्र विषय आहे. कुटूबाबाची नाट्यपरंपरा व संगीताचा वारसा त्यांच्या मुलांनी, सावकारभाचे मंडळी व अशोक सराफ यांनी पुढे चालविला. रघुवीरबाबांना शास्त्रीय संगीताचीही उत्तम जाण होती. पं. गोविंदराव अग्नीचे ते किंचित शिष्य. बाकीबाबांच्या ‘संजीवनी’ या संगीत नाटिकेत पं. अभिषेकींच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी गायन केले होते. असा हा बहुरंगी व बहुढंगी कलावंत. अभिनयाचे वरदान त्यांना लाभलेली निसर्गदत्त देणगी होती.