- शंभू भाऊ बांदेकर
गोवा हा देशातील आदर्श संघप्रदेश बनावा, गोवा हे एक आदर्श राज्य बनावे, हा भाऊसाहेबाचा ध्यास होता व त्यासाठी ते अखेरपर्यत कार्यरत राहिले.
त्यांनी बहुजन समाजाचे नेतृत्व समर्थपणे केले. त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन.
भारतातील थोर मुत्सद्दी आणि विद्वान नेते चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी एका ठिकाणी नमूद केले आहे, ‘‘हिंदुस्थानात दोनच खरे राजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि सयाजीराव गायकवाड’’. या दोन्ही महापुरुषांची चरित्रे आपण वाचली तर चक्रवर्तींच्या म्हणण्यातील मथितार्थ आपल्या लक्षात येतो. कारण हे दोन्ही महामानव काळापलीकडे पाहण्याची दृष्टी असलेले व त्यासाठी जनता जनार्दनाला बरोबर घेऊन जाणारे आणि ईप्सित साध्य करण्यासाठी अहर्निशपणे झटणारे वीरपुरूष होते. आपण गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बाळकृष्ण ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जीवनकार्याचा अभ्यास केला तर ते खर्या अर्थाने जनसामान्यांच्या हृदयात अढळस्थान मिळविलेले, शिवाजी महाराज व सयाजीराव यांना मानणारे रयतेचे राजा होते. याचे कारण भाऊसाहेबांनी जनतेची नाडी ओळखली होती. गोव्याचा व गोवेकरांचा खरा विकास कशात आहे याची त्यांना पूर्ण जाणीव होती. सोबतीला त्यांचे निष्कलंक चारित्र्य आणि दानशूरपणा होता. त्यामुळे पेडणेपासून काणकोणपर्यंत आणि वास्कोपासून वाळपईपर्यंत एखाद्या खेडेगावात किंवा शहरात भाऊंचा दौरा असेल, जाहीर कार्यक्रम असेल किंवा प्रचाराची सभा असेल, तर भाऊंचे नाव ऐकून लोकांची गर्दी होत असे. त्यांची बुद्धीसुद्धा इतकी तल्लख की एखाद्या ग्रामीण भागातील कष्टकरी काष्टीवाला दिसला की जसे त्याच्या नावानिशी हाक मारून, त्याला जवळ घेत आपुलकी दाखवत. त्याचप्रमाणे शहरातील सावकार, जमीनदार, व्यापारीही त्यांना नावानिशी माहीत असायचे. चारचौघात त्यांची नावानिशी विचारपूस केली की त्या लोकांनाही आपल्या जन्माचे सार्थक झाले असेच जणू वाटायचे. वास्तविक भाऊसाहेब व्यवसायाने खाणमालक.आपल्या खाणीवर काम करणार्या मजुरांपासून ते मॅनेजरपर्यंत सर्व थरातील, सर्व जातीधर्माच्या लोकांना सुखासमाधानाने जगता यावे, त्यांच्या मुलांना शिक्षण घेता यावे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेता यावी, खनिजमालाच्या वाहतुकीमुळे त्या भागातील लोकांना प्रदूषणाला सामोरे जावे लागू नये, खाणींची माती शेतात जाऊन शेतांची नासाडी होऊ नये यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. तत्कालीन गोव्यातील चौगुले, धेंपे, साळगावकर, तिंबले, शांतीलाल गोसालिया असे खाणमालक पाहिले तर या सर्वांनी अशा उपाययोजना केल्याचे आपल्या लक्षात येते. आज दुर्दैवाने बेकायदेशीर खाणींबरोबरच कायदेशीर खाणीही बंद कराव्या लागल्या. लाखो बेकार झाले. त्याच्या मुळाशी खाणधंद्यातील बेजबाबदारपणा व ‘अव्यापारेषु व्यापार’ ही भूमिका कारणीभूत आहे, हे निराळे सांगायला नको.
मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यावर भाऊंनी मग मागे वळून पाहिले नाही. अर्थातच त्यांच्या कारकिर्दीत गोवा, दमण, दीव हा संघप्रदेश होता. त्यामुळे दमण व दीवकडे तर त्या भागाच्या आणि तेथील जनतेच्या विकासासाठी लक्ष केंद्रित केलेच, पण गोव्यात पेडणे ते काणकोण आणि वास्को ते वाळपईपर्यंतचा सर्व भाग वेळोवेळी दौरे करून पिंजून काढला, तेथील लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न केला. कुठे आरोग्याच्या सुविधा हव्यात, कुठे पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे, कुठे क्रीडांगण हवे आहे, कुणाला घरासाठी, शेतीसाठी किंवा इतर व्यवसायासाठी सरकारी मदतीची गरज आहे या सार्या गोष्टी लक्षात घेऊन त्या प्राधान्यक्रमाने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. शिक्षणामुळे व्यक्तीत, समाजात आणि राज्यात व नंतर देशात परिवर्तन घडू शकते यावर भाऊंचा ठाम विश्वास होता. म्हणून गरीबातल्या गरीब माणसाला शिक्षण मिळालेच पाहिजे असा आग्रह धरून व त्यासाठी लोकांत जागृती निर्माण करून गोव्याच्या खेड्यापाड्यातून आणि शहरी भागातून शिक्षणाची गंगा वाहती ठेवली. वाहतुकीसाठी ग्रामीण भागातील रस्त्याच्या डागडुजीपासून तो शहराकडे धाव घेणार्या रस्त्यांच्या डांबरीकरणाकडे लक्ष केंद्रित केले. हे सारे व्यवस्थितरीत्या पार पडले की नाही याकडे लक्ष पुरवण्यासाठी सर्वत्र कार्यकर्त्यांचे जणु जाळेच विणले.
या सार्या गोष्टी करीत असताना त्यांचा मूळचा दानशूरपणा त्यांच्या विशेष कामी आला व त्यामुळेही भाऊसाहेब दीन-दुबळ्यांच्या; गोरगरीबांच्या गळ्यातील ताईत बनले. अशा लोकांच्या दुःखात सामील होऊन त्यांचे दुःख हलके करण्यासाठी हात सैल करायचा. कुणाला शिक्षणासाठी, कुणाला शेती-बागायतीसाठी तर कुणाला लग्नकार्यासाठी सढळहस्ते मदत करताना त्यांनी कधी मागे-पुढे पाहिले नाही. भाऊसाहेबांनंतर स्वतःच्या खिश्यात हात घालून स्वकष्टार्जित पैसे अशा कामांसाठी खर्च करणारे एकमेव राजकीय दाते म्हणजे अण्णा झांट्ये, हे मी स्वतः जवळून पाहिले आहे. असो.
भाऊसाहेबांच्या वेळी खाणव्यवसाय तर तेजीत होताच, शिवाय शेती, बागायती, फळे, फुले, भाज्या, मच्छिमारी, कुक्कुटपालन, वराहपालन आदि धंदेही तेजीत होते. या प्रत्येक धंद्यामध्ये अधिक उत्पादन व्हावे, अधिक लोक स्वयंपूर्ण व्हावेत, अधिकाधिक लोकांना सरकारची सगळ्या प्रकारची मदत विनाविलंब मिळावी याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. एखाद्याला मदत करायची आहे, पण त्याची केस कायद्याच्या चौकटीत बसत नाही, असे एखाद्या वरीष्ठ सनदी अधिकार्याने सांगितले तर ‘मग तू कशाला आहेस? त्याचे काम चौकटीत बसव नि करून टाक’, असे सांगायलाही ते कमी करत नसत.
भाऊसाहेब स्वभावाने तापट होते, हट्टाग्रही होते हे खरे, पण ते दुराग्रही नव्हते. त्यांच्या ठायी चांगली खिलाडू वृत्ती होती. ते चांगले खेळाडू होते. क्रिकेट, फुटबॉल, कॅरम हे त्यांचे आवडते खेळ होते. शिकार हा त्यांचा आवडता छंद होता. त्यांनी राजकारण ही दगदग आहे, असे कधी मानले नाही. तरीही विरंगुळा म्हणून सक्रीय राजकारणातूनही थोडा वेळ काढून शिकारीला जाणे किंवा आवडत्या खेळाला वेळ देणे हे काम ते जरूर करीत.
हे सारे करत असताना गोवा हा देशातील आदर्श संघप्रदेश बनावा, गोवा हे एक आदर्श राज्य बनावे, हा त्यांचा ध्यास होता व त्यासाठी ते अखेरपर्यत कार्यरत राहिले.
त्यांनी बहुजन समाजाचे नेतृत्व समर्थपणे केले, पण असे करताना उच्चवर्णियांना दुखवले नाही उलट त्यांनाही विकासाच्या कामात सामावून घेतले व बहुजनसमाजाचे या प्रदेशातील अद्वितीय नेते ठरले. त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन.