बहुआयामी व्यक्तिमत्त्व ः विष्णू सूर्या वाघ

0
912
  •  चित्रा प्रकाश क्षीरसागर
    (ताळगाव)

विष्णू वाघ यांचा २४ जुलै रोजी जन्मदिवस. त्यांनी आपल्या हयातीत मराठी कवितेचे विविध आयाम आपलेसे केले. त्यानिमित्त त्यांच्या काव्यफुलांची त्यांना स्मरणांजली.

मानवी जीवनाच्या आरंभापासूनच कविता अस्तित्वात आहेत. कवितेचं आंतरिक सामर्थ्य तिच्या आशयात असतं. कवितेचा पोत हा जगण्याच्या नि अनुभवाच्या विणीतून साकार होत असतो. निसर्गाच्या अंगणात, देवाच्या दारात कवी पावसाचा अनुभव लिहितो. मानवी काळाशी समकक्ष असल्याने कविता अनादी आहे. कविता माणसाच्या ठिकाणी असलेल्या अमरत्वाची तृष्णा शमवते.

आपल्या भोवतालच्या वास्तवाच्या सर्व वर्तुळांना सामोरे जात प्रसंगी त्यांचा भेद करण्याची क्षमता, कवितेला लागणारी संवेदनशीलता आणि प्रतिसाद हे गुण विष्णू वाघ यांच्या कवितेत आहेत. रसिकाला भावभावनांच्या कल्लोळात चिंब भिजवून टाकणार्‍या या कविता आहेत.
कवितांमध्ये कवीच्या समग्र भावविश्वाचा नकाशाच उमटलेला आहे. विष्णू वाघांच्या कवितेच्या भावविश्वाचा मुख्य घटक गाव, शेत व पाऊस. कोणत्याही कवीच्या काव्यातील प्रतिमांचा विचार करताना कवीचा कालावकाश, त्याच्या जीवनविषयक धारणा, चिंतनशीलता, संवेदनशीलता इत्यादी घटकांचा विचार करावा लागतो.
पावसाविषयी तो खूपच सजगतेने व्यक्त होतो. त्यांची- ‘‘इलां रे इलां रे पावसा रोंबाट इलां रे..’’ ही कविता त्याचे द्योतक आहे.

इलां रे इलां रे
पावसा रोंबाट इलां रे!
उगड्या आंगात आंगणांमदी
जावं नको झिला रे
झंग चकाक झंग
चकाक चकाक झंग!
वावझडीचे गडे इले
भिजान वले झाले
वार्‍यावरी फडफडता
झुडपांचे हिरवे शेले
मीरगाचे वाटेवरी
झडून घेती फुलां रे
पावसा रोंबाट इलां रे!

पाऊस आलेला आहे. हा पाऊस कवीला रोंबटासारखा वाटतो. आता रोंबाट म्हणजे काय तर गोव्यात शिगमोत्सव हा मोठा उत्सव असतो. या शिगमोत्सवात रोंबटा (रोमटा) मेळ असतो. या रोंबटा मेळात मोठमोठ्याने ढोल वाजत असतात. त्याचा आवाज खूप मोठा असतो. रोंबटामेळातील ढोल खूप मोठ्या आकाराचे असतात. त्या ढोलावर दोन्ही बाजूंनी एका नंतर एक पुरुष वाजवत असतात. मोठ्ठा आवाज येतो. या रोंबटासारखा पाऊस कवीला दिसतो. उघड्या आंगात म्हणजे कपडे न घालता अंगणात तू जाऊ नको रे झिला (पोरा) असे कवी सांगतो. वाद्याचा ताल घेतलेला आहे.

या पावसाला कवीने ‘वावझडीचे गडे’ असे म्हटले आहे. गडे म्हणजे शिमगोत्सवात नाचणारे पुरुष. ही वावझड कशी वाटते तर शिमग्यात रोंबटा मेळात नाचणार्‍या पुरुषाप्रमाणे. रस्ते भिजून गेलेले आहेत, झाडे झुडपे हे हिरव्यागार शेल्याप्रमाणे फडफडतात.

मृग नक्षत्र (पावसाचे) आले आहे. त्याच्या स्वागतासाठी फुलंसुद्धा झडत आहेत. म्हणजे त्यांचा सडा जमिनीवर पडत आहे. पाऊस येण्याआधी ढगांचा गडगडाट होतोय. वारा एवढा सुसाट वाहतो की त्याचे वावटळीत रूपांतर होऊन ही वावटळ गोल गोल फिरकी घेते. ताशावर काठी पडली की ताड ताड असा आवाज येतो. तोच आवाज पाऊस तळ्यात पडू लागला की हा ताशाचा आवाज येतो. वारा झिंगत झिंगत चालला आहे कारण त्याने थोडीशी फेणी प्यायली आहे, असं कवी म्हणतो. शिमग्यात नाचणारे जे पुरुष असतात त्यांच्यावर अवसर येतो असं म्हणतात. तसा भार या पावसावर आला आहे. तो प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन नाचतो. वीज आपली लखलखते. तो हार ती वेतोबाला घालते.

आभाळ एवढ्या मोठ्या प्रमाणात पावसाच्या रूपाने धरणीवर पडत असतो की आकाशाने आपले काळीज काढून धरणीला जणू दिलं आहे. यातून शिमगोत्सवातील खाणाखुणा या पावसाच्या रूपात किती तादात्म्य पावतात दोन्हीही बरोबर कोसळतात. म्हणजे पाऊस युगानुयुगे धरणीची तहान भागवतच आला आहे. निसर्ग आणि सृष्टीचा जीवन संघर्ष पाऊस पडून गेला की, नव्या रूपात प्रकटतो. निसर्ग हे सृष्टीचे अंग आहे तशीच सृष्टीत जगणारी जीवसृष्टीसुद्धा समस्त सृष्टीचे अंगच आहे. निसर्गाच्या भ्रम-विभ्रमी आणि निसर्गाच्या ऋतुचक्राशी अनादी काळापासून माणूस संघर्ष करत आला आहे नि एकरूपही झाला आहे.

शिमगोत्सव ही गोव्याची संस्कृती आहे. या संस्कृतीशी पावसाचं असलेलं नातं विष्णू वाघ यांनी अधोरेखित केलं आहे.

हा पाऊस माझ्या
कुडीस झोंबत
झिंगत झिंगत येतो…
या शेताच्या शेजेवरती
मला पिसडूनी जातो!
हा प्रियकर माझा
मत्त रांगडा, जरा यास ना धीर…

आता या कवितेत शेतात राबणार्‍या स्त्रिया आहेत. त्या शेतात भाताची लावणी करत आहेत आणि पाऊस एवढा कोसळायला लागला की त्यांच्या शरीराला तो झोंबत आहे असेच वाटते. पावसाचे टपोरे थेंब अंगाला सुया टोचल्यासारखा अनुभव देतात. त्यांची धांदल झाली की त्या झाडांचा आसरा शोधत येतात. तोपर्यंत हा पाऊस त्यांना पिसडून टाकणारा म्हणजे धावपळ करणारा, त्यांचे केस, पदर विस्कटून टाकणारा आहे. त्यांना कुस्करून टाकणारा आहे.

तरीदेखील सर्व स्त्रियांना हा पाऊस प्रियकर वाटतो. याला रांगडा हा शब्द वापरला आहे. त्याला धीर नाही, सबुरी नाही. पाहता पाहता बिलगतो. पावसामुळे शेतात चिखल चिखल होतो. तो चिखल पळण्याच्या आवेशात अंगावर येतो. आणि याला कवी उपमा देतो मोराचा रंगपिसारा भासतो. अंगावर पाऊस पडल्यामुळे शहारा आलेला आहे. या पावसाच्या पाण्यामधून अंगात वीज संचारल्यासारखी होत आहे. विजांचा कल्लोळ चालला आहे. अशा पावसाच्या तुफानात बायका अंग चोरून उभ्या राहतात. आणि हा पाऊस निसर्गाला, झाडापेडांना, शेताला साद घालत असतो.

बायकांची धांदल उडवतो. त्यांना चिप्प भिजवून टाकतो. त्यामुळे त्यांचे कपडे अंगाला चिकटतात. शेतातले पुरुष त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. तेव्हा या बाया पावसाला शिव्या देतात. यातून ही कविता आली आहे.
आता ही कवितादेखील पावसाचीच आहे. परंतु वेगळी आहे. या कवितेतून पावसामधून मल्हाराची धून ऐकायला येते-

थेंबटुल्यांची पांयजणां ही वाजती छनन छून
सरींच्या ग सतारींतून मल्हाराची धून…

कविता समजून घेता आली पाहिजे मग ती कुठल्याही छंदात असो की मुक्त असो. ती वाचकांना भावणारी असावी.

घन गरजत येती
झाली कासावीस माती
फणा काढते हळूच
लख्ख जोगलांची भीती

गच्च पिऊनी अंधार
वारा हसतो पिसाट
वस्त्रं फेडून सावल्या
नभीं धावती सुसाट
कोसळून येती खाली
ओल्या आभाळाच्या भिंती

उन्हाळ्याचे दिवस. गरमीने जीव कासावीस होतो. तसंच या मातीचा जीवसुद्धा या पावसासाठी कासावीस झाला आहे. या पावसाची तीसुद्धा वाट पाहात असते. आभाळात मेघांची गर्दी होऊ लागते. विजा लख्ख प्रकाश देऊ लागतात. मध्येच वीज चमकते. या चमकण्याला भुजंग जसा फणा काढतो याची उपमा दिली आहे. श्यामलवर्णी मेघ जमून आल्याकारणाने आसमंतात अंधार दाटून आला आहे. वारा पिसाटासारखा धावतो आहे आणि पाऊस दोन दृश्यांमध्ये भिंत तयार करतात.

एवढा पाऊस पडतो की आपल्याला पुढचं काहीच दिसत नाही. आजूबाजूला सर्वच ठिकाणी या पिसाट पावसाला पूर आला आहे. विजांचा कल्लोळ सुरू आहे आणि कधी कधी तुफान पाऊस आला की आपल्या घरातील लाइट जाते आणि आपण पटकन देव्हार्‍यातील दिवा पेटवतो. या दिव्यालाही विजेची उपमा दिली आहे.
कविता ही विष्णू सूर्या वाघ यांचा प्राण असल्याने अनेक पदरी अनुभवांतून आणि प्रतिमांच्या भाषेतून साकारली आहे.
वरील सर्व कविता त्यांच्या ‘झिंझिर झिंझिर सांज’ या कवितासंग्रहातून घेतल्या आहेत. विष्णू वाघ यांना त्यांच्या जयंतीदिनी कवितेच्या रसग्रहणातून भावांजली.