जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा काल मोठा अपघात घडला. निवडणुकीसाठी तैनात असलेल्या जवानांना घेऊन जाणारी बस ब्रेल गावातील खोल दरीत कोसळली. या बसमधून 36 जवान प्रवास करत होते, त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले.
जम्मू-काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान संपन्न झाले होते. दुसऱ्या टप्प्याचे मतदान आता 25 सप्टेंबर रोजी होणार आहे. 26 विधानसभा मतदारसंघात होणार असलेल्या मतदानासाठी 36 जवानांची तुकडी रवाना होत होती. यावेळी बडगाम जिल्ह्यातील ब्रेल गावानजीक दरीत कोसळून बसचा अपघात झाला.यावेळी स्थानिकांच्या मदतीने सुरक्षा दलाने बचाव कार्य हाती घेतले. जखमी जवानांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.