अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम म्हणून गोव्यात गेले काही दिवस संततधार सुरू आहे. अनेक भागांत ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊसही झाला. या अवकाळी पावसामुळे अर्थातच कापणीसाठी सज्ज असलेले भात पीक आडवे झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास असा निसर्गाच्या एका फटक्यात हिरावला गेल्याने खेड्यापाड्यांतील शेतकरीवर्ग आज हवालदिल झालेला दिसतो. अनेक शेतकर्यांनी दिवाळीपूर्वी आपली भातकापणी आटोपलेली असली, तरी कित्येक गावांमध्ये शेतांमधील भातपीक पूर्ण भराला आलेले होते. अवकाळी पावसाच्या मार्यात हे कापणी न झालेले भातपीक आडवे होऊन त्याची नासधूस झाली आहे. भातपीक हे गोव्यातील शेतकर्याचे उत्पन्नाचे साधन आहे, त्यामुळे त्याला अवकाळी पावसाचा असा फटका बसणे म्हणजे शेतकर्याच्या पोटावर पाय येण्यासारखेच आहे. त्यामुळे कृषी खात्याने विनाविलंब या नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या नुकसानाची पाहणी करून त्यांना लवकरात लवकर योग्य नुकसान भरपाई देण्याच्या दिशेने पावले टाकली पाहिजेत. सर्वसामान्य शेतकरी आपल्या कष्टाच्या कमाईवर आपली व कुटुंबाची गुजराण करीत असतो. त्यामुळे उभे भातपीक नष्ट झाल्याने त्याच्यासमोर पेचप्रसंग उभा राहिलेला आहे. शहरांमधून राहणार्यांना त्याचे दुःख कदाचित जाणवणार नाही, परंतु खेड्यापाड्यांमध्ये, दुर्गम भागांमध्ये राहणार्या गोरगरीब शेतकर्याला या संकटाच्या घडीस दिलासा हवा आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळाचे रूप धारण करण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवलेली आहे. त्याला त्यांनी ‘निलोफर’ असे नावही दिलेले आहे. हे चक्रीवादळ अरबी समुद्रातून ओमानच्या दिशेने, आखाती देशांकडे वाटचाल करील असे अनुमान आहे. मात्र, त्या वेगवान वार्यांचा रोख बदलला आणि ते किनारपट्टीकडे सरकले, तर गोव्यासह संपूर्ण कोकणपट्टीवर संकट ओढवू शकते. त्या दृष्टीने या चक्रीवादळाच्या प्रवासावर हवामान खात्याची आणि राज्य प्रशासनाची नजर असणे आवश्यक आहे. आंध्र प्रदेशच्या किनार्यावर नुकताच चक्रीवादळाने हाहाकार माजविला. पण आंध्र प्रदेशला अशी वादळे काही नवीन नाहीत. दरवर्षी तेथे याच सुमारास वादळे येऊन थडकत असतात. त्यामुळे तेथील नागरिकही त्याच्या मुकाबल्यासाठी सज्ज असतात. तरीदेखील प्रत्येक चक्रीवादळ वाताहत घडवीतच असते. त्यामुळे गेल्या वादळात तेथे लाखो लोक बेघर झाले आहेत. झाडापेडांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. गोव्याला सुदैवाने अशा मोठ्या चक्रीवादळाचा सहसा सामना करावा लागत नाही, परंतु काही भागांमध्ये वादळ होऊन नुकसान होण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. सत्तरीसारख्या भागात तर शेतकर्यांचे त्यामुळे अनेकदा नुकसान झाले आहे. अशी आपत्ती ओढवली की मग प्रशासन जागे होते आणि मदतकार्याला लागते, परंतु अशा आपत्ती नेहमीच सांगून येतात असे नाही. त्यामुळे आपत्तीच्या मुकाबल्यासाठी आपल्या यंत्रणांपाशी पुरेशी सज्जता आहे का याची चाचपणी गांभीर्याने होण्याची जरूरी आहे. गोव्यातील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे माजी संचालक डॉ. सतीश शेट्ये यांनी राज्याने पूरसदृश्य स्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असले पाहिजे असा इशारा नुकताच दिलेला आहे. थोडा प्रमाणाबाहेर पाऊस पडला की आपल्या राजधानीसह अनेक शहरे पाण्याखाली जातात. काही भागांमध्ये तर पाणी भरण्याचे प्रकार दरवर्षी होत असतात. पणजीच्या मळा भागात, अठरा जून रस्त्यावर, बांदोडकर मार्गावर पाणी भरणे हे आता पणजीकरांच्या नित्य सवयीचे झाले आहे. यंदा गेल्या पावसात तर इतर भागही पाण्याखाली गेले. मोठ्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी काय होईल याची तर कल्पनाही करवत नाही. अलीकडेच श्रीनगरमध्ये झेलमच्या कहरात त्या शहराची कशी वाताहत झाली त्याचे उदाहरण तर आपल्या समोर ताजेच आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यास गोवा किती सज्ज आहे, याची सखोल चाचपणी सरकारने करावी आणि कोठे त्रुटी असतील तर त्या दूर करण्यासाठी पावले टाकावीत. तूर्त शेतकर्यांना अवकाळी पावसाने झालेल्या हानीची यथायोग्य भरपाई लवकरात लवकर देण्यासाठी सरकारने पावले टाकणे जरूरीचे आहे. ऐन दिवाळीत बळीराजाचे डोळे ओले राहता कामा नयेत!