बळीराजाचा एल्गार

0
104

देशातील प्रमुख शेतकरी संघटनांच्या भारतीय किसान महासंघाने आज भारत बंद पुकारला आहे. जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेतच हा बंद पाळला जाईल असे शेतकरी संघटनांनी काल जाहीर करून जनतेची मने जिंकली आहेत. यापूर्वीही जेव्हा जेव्हा शेतकरी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरला, तेव्हा आम नागरिकांची गैरसोय होऊ नये हे त्याने कटाक्षाने पाहिले आहे. ‘गाव बंद’ ची घोषणा करून मुंबईवर धडकलेला शेतकरी मोर्चा आठवा, तेव्हा देखील शेतकर्‍यांनी याच माणुसकीचे दर्शन घडवून जनतेची मने जिंकली होती. तेव्हा विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षा दुसर्‍या दिवशी व्हायच्या होत्या. जवळजवळ पन्नास हजार शेतकरी नाशिकहून अथक पायपीट करून मुंबईत येऊन धडकले होते. त्यांना तेव्हा शीवच्या वेशीवर रोखण्यात आले होते. रात्री थोडी विश्रांती घेऊन ते दुसर्‍या दिवशी मुंबईतील आझाद मैदानावर येऊ शकले असते, परंतु केवळ विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून विश्रांतीवर पाणी सोडून रातोरात हे हजारो शेतकरी उपाशीपोटी आझाद मैदानावर मध्यरात्रीच येऊन दाखल झाले होते. बळीराजाची हीच माणुसकी आजच्या बंदच्या संदर्भातील ‘अकरा ते तीन’च्या घोषणेतून व्यक्त झाली आहे.
बळीराजा हा देशाचा पोशिंदा आहे. त्याच्या ज्या काही मागण्या असतील त्याकडे सरकारने – मग ते कोणाचेही का असेना – सहानुभूतीपूर्वकच पाहिले पाहिजे. शेतकर्‍यांच्या सध्याच्या आंदोलनाला दडपण्यासाठी सुरवातीला हरियाणासारख्या राज्यामध्ये दडपशाहीचा वापर झाला. दिल्लीकडे कूच करून येणार्‍या शेतकर्‍यांना रोखण्यासाठी लाठीमार काय केला गेला, पाण्याचे फवारे काय मारले गेले, परंतु त्यातून झाले असे की शेतकर्‍यांच्या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले आणि जनतेचा त्यांना भरभरून पाठिंबा मिळत गेला. आजच्या शेतकर्‍यांच्या बंदला केवळ विरोधी राजकीय पक्षच नव्हेत, तर कामगार संघटना, बँक कर्मचारी संघटना, ट्रक वाहतूकदार, टॅक्सी संघटना अशा नानाविध संघटनांकडून सक्रिय पाठिंबा व्यक्त झालेला आहे. शेवटी हा बंद लाक्षणिक स्वरूपाचा आहे. त्यामुळे त्याच्या यशापयशाचे मोजमाप करण्याचा प्रयत्न सरकारने बिलकूल करू नये. शेतकर्‍यावर रस्त्यावर उतरण्याची ही वेळ का ओढवली आहे याचा विचार झाला पाहिजे. त्याच्या मनातील शंकांचे निरसन झाले पाहिजे. केवळ त्यांचे आंदोलन राजकारणप्रेरित आहे असे म्हणून ते निकाली काढता येणार नाही.
बुधवारी पुन्हा सरकार शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चेची सहावी फेरी करणार आहे. मात्र, सरकारने आपला हटवादीपणा आणि शेतकर्‍यांनी नव्या कृषी कायद्यांसंदर्भात आपली संपूर्ण नकारात्मक भूमिका सोडल्याखेरीज या विषयात सुवर्णमध्य निघणे कठीण असेल हेही तितकेच खरे आहे. नव्या कृषी कायद्यांतील खटकणार्‍या बाबींसंदर्भात सरकारने अधिक स्पष्टता दर्शवणे आवश्यक आहे. मोदी सरकारने आणलेले नवे कृषिकायदे क्रांतिकारक आहे यात वादच नाही. परंतु या सगळ्या नव्या बाबी आहेत, ज्यांचा पूर्वानुभव शेतकर्‍यांना नाही. त्यामुळे साहजिकच त्याच्या मनात अनेक प्रश्न आहेत. मोदी सरकारने आणलेले नवे कायदे हे मूलभूत सुधारणा घडविणारे असल्याने भारतातील शेतीचा पायाच हलवून सोडणारे असल्याने त्यासंदर्भातील बळीराजाची साशंकता निश्‍चित दूर झाली पाहिजे. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा वायदा मोदी सरकारने केला होता. कर्जमाफी देऊन नव्हे, तर अन्य मार्गांनी शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट केले जाईल असे सरकार आजवर सांगत आले. आता शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करीत असताना शेतीचे कॉर्पोरेटीकरण होणार नाही आणि सरकारच्या निकटवर्ती बड्या उद्योगपतींच्या कब्जात भारतीय शेतकरी जाणार नाही हा विश्वासही शेतकर्‍यांना द्यावा लागेल. या विषयातील खाचाखोचांवर आम्ही यापूर्वीच लिहून झालेले आहे. शेतकर्‍यांच्या मनातील शंका, त्यावरील सरकारने केलेली तडजोड आदींचा उहापोह यापूर्वीच करून झालेला आहे. त्यामुळे त्या सगळ्याची येथे पुनरावृत्ती करण्याची गरज नसावी. परंतु शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे आणि त्याला या देशामध्ये सन्मानाचेच स्थान असले पाहिजे हे भान सरकारने कायम ठेवणे आवश्यक आहे. मंडींमधील अडत्यांच्या आणि दलालांच्या जाचातून त्याला मुक्त करीत असताना नवे कॉर्पोरेट दलाल निर्माण होणार नाहीत आणि त्याची पिळवणूक करणार नाहीत हे पाहण्यासाठी नव्या कृषी कायद्यांसंदर्भात अधिक पारदर्शकता आणि स्पष्टता नितांत गरजेची आहे हे आम्ही वेळोवेळी अधोरेखित केलेले आहे आणि आजही त्याचाच पुनरुच्चार आम्ही करू इच्छितो. बळीराजाचा आजचा एल्गार हा निर्णायक ठरावा. त्याच्या सहनशक्तीची आणि संयमाची आणखी परिसीमा सरकारकडून पाहिली जाऊ नये. आजचा बंद संवेदनशीलतेने आणि सहानुभूतीपूर्वक हाताळला गेला पाहिजे.