>> संरक्षणमंत्री राजनाथ सिंह; काश्मीरमधील परिस्थिती बदलली
पाकव्याप्त काश्मीर (पीओके) भारत कधीही सोडणार नाही, परंतु जबरदस्तीने ते ताब्यातही घेणार नाही. पीओके घेण्यासाठी आम्हाला बळाचा वापर करावा लागणार नाही; कारण काश्मीरचा विकास पाहून पीओकेचे नागरिक स्वतःहून भारतात सामील होतील, असे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
मला वाटते की भारताला काहीही करावे लागणार नाही. जम्मू आणि काश्मीरमध्ये ज्या प्रकारे ग्राउंड परिस्थिती बदलली आहे, ज्या प्रकारे या प्रदेशात आर्थिक प्रगती होत आहे आणि ज्या प्रकारे तेथे शांतता परत आली आहे. पीओके घेण्यासाठी आम्हाला बळाचा वापर करावा लागणार नाही; कारण तेथील लोकच म्हणतील की आम्हाला भारतात विलीन केले पाहिजे. पीओके आमचा होता, आहे आणि राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कलम 370 रद्द केल्यापासून काश्मीरमधील सुधारलेल्या परिस्थितीचा संरक्षणमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. परिणामी लवकरच या केंद्रशासित प्रदेशात आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट (अफ्स्पा)ची गरज भासणार नाही, असेही राजनाथ सिंह म्हणाले.